▪️चामोर्शी पोलीस स्टेशन समोरच व्यसनाचा अड्डा, मुक्तीपथ पथकाची धडक कारवाई
▪️नाश्त्याच्या दुकानात राजरोसपणे तंबाखू विक्री आणि मद्यप्राशन सुर..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
गडचिरोली / चामोर्शी : ( इंडिया 24 न्युज ) – व्यसनमुक्त गडचिरोली अभियानांतर्गत चामोर्शी येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या अनिल पुट्टावार यांच्या नाश्त्याच्या दुकानात मुक्तीपथच्या व्यसनमुक्ती पथकाने छापा टाकला असता, तेथे अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि काही व्यक्ती मद्यप्राशन करत असल्याचे निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन समोरच हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. याची माहिती मुक्तीपथ पथकाला मिळताच त्यांनी तात्काळ छापेमारी केली. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस स्टेशन समोरच नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. व्यसनमुक्तीच्या उद्देशाने करण्यात आलेली ही कारवाई अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
या प्रकरणी मुक्तीपथचे तालुका संघटक आनंद इंगळे, तालुका उपसंघटक आनंद सिडाम, तालुका उपसंघटक विनोद पांडे आणि स्पार्क कार्यकर्ता समिक्षा ढोंगे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास चामोर्शीचे ठाणेदार महादेव ढाकणे करीत आहेत.
या कारवाईमुळे व्यसनमुक्ती अभियानाला अधिक बळ मिळाले असून, नागरिकांमध्ये जनजागृतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


