सिंदेवाही तालुक्यात मानवी रक्ताने माखले शिवार!
आठवडाभरात तिघांचा बळी; दहा किलोमीटरच्या परिसरात मृत्यूचे तांडव, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही: इंडिया २४ न्युज
सिंदेवाही तालुक्यात मानव – वन्यजीव संघर्षाने आता भीषण रूप धारण केले असून, वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरात मृत्यूचे सावट पसरले आहे. याच आठवड्यात यापूर्वी वाघाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास आणखी एका शेतकऱ्यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी अंत झाला. पत्रू मेश्राम (वय ६३) रा. धूमनखेडा असे मृतकाचे नाव असून, गावालगतच्या शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.
विशेष म्हणजे या तिन्ही घटना दहा किलोमीटरच्या परिसरात आणि शेत शिवारात घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. या हल्ल्यामागे एकच वाघ आहे की परिसरात अनेक वाघाचा वावर आहे, असा संंतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
शेती वाचवायची की जीव? शेतकऱ्यासमोर गंभीरपेच!
सध्या धान शेतीचा हंगाम सुरु असून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची शेतशिवारात लगबग सुरु आहे. आधीच अपुऱ्या पावसामुळे धान पीके करपण्याच्या मार्गावर असताना, उरलेसुरले पीक वाचविण्यासाठी शेतात जाणेही शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. एका बाजूला पिके वाचविण्याची धडपड, तर दुसऱ्या बाजूला वाघाच्या हल्ल्याची टांगती तलवार अशी “इकडे आड, तिकडे विहीर” परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे.
वनविभागाचे प्रयत्न सुरू! मात्र, वाघाचा बंदोबस्त कधी? शेतकरी धास्तावले….
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवरही नागरिकाकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आता आणखी किती निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार ; असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित करीत आहेत. परिसरातील शेतकरी जीव मुठीत धरून जगत आहेत. शेतकऱ्यांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी वनविभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक असल्यास वरीष्ठ स्थरावरून विशेष बचाव पथक तैनात करावे. अशी मागणी जोर धरत आहे.
शेतात जायचे तर वाघाची भीती आणि शेतात गेले नाही तर हातचे पीक जाण्याची वेळ! अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता प्रशासनाकडून ठोस कारवाईची प्रतीक्षा आहे.


