कच्चेपार मध्ये आरोग्याशी खेळ: मृत्त मांजरामुळे विहीर दूषित ; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा ग्रामस्थांचा संताप!

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:(इंडिया २४ न्युज )दि.१६ नोव्हें. २०२६
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कच्चेपार येथे ग्रामस्थांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गावातील आरओ (RO) प्लांटसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मांजर पडून मृत्यू पावल्याने संपूर्ण पाण्याचा स्त्रोत दुषित झाला आहे. मात्र प्रशासनाने गांभीर्य न दाखविता विहीरीतील पूर्ण पाणी न उपसताच ब्लिचिंग पावडर टाकून औपचारिकता पूर्ण केली. परिणामी, पाणी शुद्ध न झाल्याने आरो (RO)प्लांट बंदच असून, गावकऱ्यांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. विहीरीचे पाणी पूर्णपणे उपसून गाळ काढण्याची ग्रामस्थांची तीव्र मागणी आहे.
सरकारी विहीरीवर खाजगी मोटारपंपचा दरोडा!
या प्रकारामुळे ग्रामपंचायतच्या कारभार चव्हाट्यावर आला आहे. ज्या सार्वजनीक विहीरीवर पाणीपुरवठा यंत्रणा आहे, तिथे चक्क चार खाजगी मोटर पंप बेकायदेशीरपणे ठोकण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर गावातील तर सर्वच सार्वजनिक विहिरीवरही अशाच प्रकारे खाजगी पंप लावून पाण्याचा अनिर्बंध उपसा सुरू आहे.
यंदा अपुरा पाऊस पडल्याने आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना, ” ग्रामपंचायतीने या खाजगी पंपाना कोणती सवलत दिली आहे? की हा सर्व मनमानी कारभार आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
आता कारवाई होणार का? जनतेचे लागले लक्ष!
प्रत्यक्ष ठोस कारवाई कधी होणार? असा प्रश्न गावकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शुद्ध पेयजल मिळणे हा मूलभूत अधिकार असताना, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात आणि खाजगी पंपधारकांवर आता नेमकी काय दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई होणार? याकडे संपूर्ण कच्चेपारच्या जनतेचे डोळे लागले आहेत.


