▪️वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी..
▪️वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी..

डॉ.आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो.क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मरेगाव येथील शेतकरी श्री . मारोती पेंदोर रा.मरेगाव याने घरची जनावरे चराईसाठी नेले असता या ३१ वर्षीय युवा शेतकऱ्यावर झाडामागे दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवार (ता. २६) दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान मरेगाव- चितेगाव हद्दीतील शेतशिवारात घडली.
मारोती हा नेहमीप्रमाणे आपल्या घरची जनावरे घेऊन मरेगाव चितेगाव हद्दीतील शेतशिवाात चराईसाठी गेला होता. सर्वे क्रमांक १०६ मध्ये विजय जुमनाके यांच्या शेतशिवारात जनावरे चारत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. मारोतीच्या हाताला आणि पाठीवर गंभीर जखमा आहेत.
ही घटना गावात माहित होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनरक्षक नागोशे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पाटील पुंडलिक जवादे आणि गावकऱ्यांच्या मदतीने जखमी मारोती पेंदोर याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
मात्र मूल तालुक्यात वाघाचे हल्ले सुरूच असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाघाच्या भीतीमुळे खरीप हंगामातील शेती करायची तर कशी ? हा मोठा प्रश्न नागरिक व शेतकऱ्यांना भेडसावत असून वनविभागाच्या वतीने या मानवी रक्ताला चटावलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत असून शासनाच्या या धोरणामुळे जनतेचा रोष वाढिस लागला आहे . याच आठवड्यात चिखली येथील दोन म्हशिंवर उमा नदीच्या तीरावर पट्टेदार वाघाने हल्ला करून दोन्ही म्हशींना गंभीर जखमी केले होते. वन विभाग वन्य प्राण्यांच्या सुरक्षितेबाबत तत्पर आहे. मग शेतकरी, शेतमजूर आणि चराईसाठी जाणारे जनावरे यांचे बाबतीत गंभीर का नाही? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे.
वन विभागाने तात्काळ उपाययोजना न केल्यास परिसरातील शेतकरी, मजूर आणि गुराखी यांचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.