▪️कोळसा उत्खननामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : आ. किशोर जोरगेवा
▪️कोल वॉशऱ्यांमुळे सर्वाधिक नुकसान, सभागृहाचे वेधले लक्ष..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोळसा उत्खननामुळे गंभीर प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या असून, या प्रदूषणाचा परिणाम केवळ हवेत किंवा पाण्यात मर्यादित न राहता शेतजमिनींवर आणि घरांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरी वस्तीमध्ये असलेल्या कोल वॉशऱ्या प्रदूषणाचे मोठे कारण ठरत असून, या कोळसा वॉशऱ्या बंद कराव्यात, अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
कोल वॉशऱ्यांजवळील शेतजमिनींवर थेट परिणाम होत असून, पिकांचे नुकसान, जमिनीची सुपीकता कमी होणे, सिंचनासाठी वापरले जाणारे पाणी दूषित होणे असे गंभीर परिणाम स्थानिक शेतकरी आणि नागरिक भोगत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोलीमुळे चंद्रपूरात होणाऱ्या प्रदूषणाकडे आणि त्यामुळे होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या विषयावर संबंधित कोळसा उत्पादक जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली आहे.
कोळशाचा सर्वात मोठा ग्राहक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी) असल्याने अनेक कोल वॉशऱ्यांची निर्मिती झाली असून त्या शेतीप्रधान भागात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढवत आहेत. विशेष म्हणजे पॉवर प्लांट आणि डब्ल्यूसीएलपेक्षाही वॉशऱ्यांचे प्रदूषण अधिक गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे.
या वॉशऱ्यांजवळील शेती क्षेत्र, जमिनीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता यावर प्रतिकूल परिणाम होत असून, प्रदूषित पाण्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. प्रभावित शेतकऱ्यांना कोणताही लाभ किंवा नुकसानभरपाई दिली जात नाही. आजतागायत अशा भागांसाठी कोणतीही स्पष्ट धोरणात्मक योजना अस्तित्वात नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी अधिवेशनात सांगितले. येथील कापसाचे आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले आहेत, मात्र त्याचा अहवाल अजून आलेला नाही, असेही त्यांनी सभागृहात सांगितले. वेकोली कडून करण्यात येणाऱ्या स्फोटामुळे अनेक घरांना भेगा जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या पार्श्वभूमीवर विधानसभेत राज्य सरकारचे लक्ष वेधत, डब्ल्यूसीएल, कोल इंडिया या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी त्यांनी केली.
▪️चंद्रपूर जिल्ह्यातील २१४ मुली व महिला बेपत्ता – आमदार जोरगेवार यांनी सभागृहात उपस्थित केला गंभीर मुद्दा
चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली आणि महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचा गंभीर मुद्दा विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला.
यावेळी मागील अडीच वर्षांची आकडेवारी सभागृहात सादर करताना दररोज सरासरी तीन मुली अथवा महिला बेपत्ता होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील काहींचा शोध लागलेला असला तरी एकूण २१४ महिला आणि मुली अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
याप्रसंगी ते म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचा अपरिचित व्यक्तींशी संपर्क येत असून त्याचा गैरवापर केला जात आहे. काही लोक सोशल मीडियावरून महिलांना फसवून, त्यांच्याशी ओळख वाढवून, त्यांना चुकीच्या मार्गाने वेगवेगळ्या राज्यात पाठवून फसवत आहेत.
मागील अडीच वर्षांच्या काळात २ हजार ७३० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये २ हजार ३०१ महिला आणि ४३९ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यातील अनेकांचा शोध लागला असला तरी अद्यापही २१४ महिला व मुली बेपत्ता असल्याचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडले.
या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात यावा तसेच बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी सभागृहात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.