आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नवभारत कन्या विद्यालय मुल येथे १७३ विद्यार्थिनींना एसटी मोफत प्रवास पास वाटप : एक स्तुत्य उपक्रम..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७

मूल : (इंडिया २४ न्यूज) : राज्य परिवहन विभाग, चंद्रपूर एस.टी. आगारच्या वतीने नवभारत कन्या विद्यालय, मूल येथे आज एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत थेट शाळेत जाऊन १७३ विद्यार्थिनींना मोफत प्रवास पास वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना चंद्रपूरला जाऊन पास काढण्याची गैरसोय टळली असून, त्यांच्या शिक्षण प्रवासात ही योजना मोठा आधार ठरणार आहे.
या विशेष उपक्रमासाठी राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रक सौ. स्मिता सुतवने, मुख्याध्यापिका कु. अल्का वरगंटीवार, चंद्रपूर बस स्थानक प्रमुख श्री. हेमंत गोवर्धन, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. नागापुरे, तसेच श्री. सतीश लुथडे यांची विशेष उपस्थिती होती.
विभाग नियंत्रक स्मिता सुतवने यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, “एसटी सेवा ही ग्रामीण आणि शालेय विद्यार्थिनींसाठी केवळ एक प्रवास व्यवस्था नसून, त्यांच्या शिक्षण आणि आत्मनिर्भरतेचा मजबूत आधार आहे. शाळेपर्यंत पोहोचणं सोपं होणं म्हणजे शिक्षणात सातत्य निर्माण होणं. त्यामुळे नियमितपणे एसटीने प्रवास करा आणि या सेवेचा लाभ घ्या.”
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. वरगंटीवार यांनी परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक आभार मानत, “विद्यार्थिनींसाठी थेट शाळेत पास वितरण होणे म्हणजे एक सकारात्मक पाऊल आहे. या योजनेचा अनेक विद्यार्थिनींना लाभ होणार असून त्यांची आर्थिक आणि मानसिक धडपड कमी होईल,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सिद्धावार यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका अर्चना बेलसरे यांनी केले. उपस्थित विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंदांनीही या उपक्रमाचे स्वागत करत, “शासनाच्या या योजनांनी शिक्षणाला चालना मिळते,” असे प्रतिपादन केले.
हा उपक्रम केवळ पास वाटपापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यामागील संवेदनशील विचार, शासकीय यंत्रणांचा संवाद, आणि शाळा स्तरावर सेवा पोहोचवण्याचा ध्यास याचा आदर्श ठरला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.