▪️मूल शहरामध्ये मोकाट जनावरांचा हैदोस: नागरिक त्रस्त, प्रशासन निष्क्रिय..

डॉ.आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र.९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल शहरात मोकाट जनावरांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरात अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप मूल शहरातील नागरिकांनी केले आहे.रस्त्यांवर आणि महामार्गांवर अचानक समोर येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालक, विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वार गंभीर अपघातांना बळी पडत आहेत. मूल शहराला बायपास नसल्यामुळे जड वाहने शहरातूनच जातात आणि ही जनावरे रस्त्यांवर, चौकात तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठाण मांडून बसतात. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
मोकाट जनावरे पकडण्यासाठी मजूर लावूनही शहरात अशी भीषण अवस्था का निर्माण झाली आहे, हे एक कोडेच आहे.अनेकदा या प्रश्नावर अवगत करूनही संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे का दुर्लक्ष करत आहेत , हे समजण्यापलीकडचे आहे. या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, जनावरांच्या मालकांना कठोरपणे समज देऊन जागरूक करावे . अशी मूल नगरवासियांची रास्त मागणी आहे.नागरिकांना या समस्येतून दिलासा कधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.