▪️देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या माध्यमातून मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया व चष्म्यांचे वितरण..
▪️आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून सेवाभावी उपक्रम..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नि:शुल्क चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सर्व रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची व तेथील व्यवस्थेबाबत विचारपूस केली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह च्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. समाजातील सर्वसामान्य घटकांना मदतीचा हात देण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सेवा सप्ताहात आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी तपासणी करून घेतली. विशेषतः डोळ्यांच्या तपासणीत अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदूची समस्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तातडीने व्यवस्था करण्यात आली. या अंतर्गत ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
आज बुधवारी या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी स्वतः रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मोतीबिंदूच्या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य वेळी उपचार न झाल्यास दृष्टी गमावण्याची वेळ येते. मात्र, अशा शिबिरांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी मिळते. सेवाभावी कार्यातून समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळवून देणे हेच खरे जनसेवेचे आणि मानवसेवेचे ध्येय असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष आदमाने, देवा कुंटा यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.