▪️अकोट तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा : संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेषतः उमरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या संत्रा पिकावर याचा मोठा परिणाम झाला असून आंबीया बाहारावरील संत्रा फळांची प्रचंड गळती झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत संत्रा उत्पादक शेतकरी महसूल मंडळ उमरा यांच्यातर्फे तालुका कृषि अधिकारी तसेच तहसीलदार अकोट यांच्याकडे नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शासन मदत जाहीर करण्याची मागणी समाजसेवक शेतकरीनेते गजानन हरणे यांच्या मार्गदर्शनत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दिलीप तराळे, गजानन सुकूशे ,पवन भरत, प्रमोद तारळे ,विनोद बनसोड, मुकेश बगानी ,अंकित तराळे, गणेश माळते ,.विष्णुभाऊ मंगळे , सुनील पांडे , दिपक सावरकर ,अनिल साबळे , अमोल मंगळे यांच्या वतीने
करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “सततच्या पावसामुळे झाडावरील फळे झडून गेली असून येणाऱ्या हंगामातील अपेक्षित उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परंतु अद्याप प्रशासनाकडून नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडत आहेत.”संत्रा पिक हे अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. परंतु या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर उपजीविकेचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शिफारस करावी, अन्यथा शेतकऱ्यांना तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून नुकसानभरपाईची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याची गरज आहे. अन्यथा संत्रा उत्पादक शेतकरी आणखी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



