आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सेवारी ग्रामपंचायतीतील निधी घोटाळ्यावर CPI आक्रमक..

▪️प्रशासन कारवाई करणार की जनतेला न्याय नाकारणार?

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

एटापल्ली – ( इंडिया 24 न्युज ) : ग्रामपंचायत सेवारी (ता. एटापल्ली) येथील नागरिकांनी गावातील निधी गैरव्यवहार व अपारदर्शक कारभाराबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) कडे मदत मागितल्यानंतर CPI ने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांनी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्याकडे धाव घेत आपली समस्या मांडली. त्यानंतर CPI तालुका समिती एटापल्ली यांच्या वतीने पंचायत समिती एटापल्ली येथील गटविकास अधिकारी (BDO) यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, सेवारी ग्रामपंचायतीला १५ वा वित्त आयोग, मनरेगा (MGNREGA), ग्रामनिधी तसेच इतर विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीचा वापर कसा झाला, कोणती कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली व कोणती फक्त कागदावरच दाखवली गेली, याचा कोणताही स्पष्ट हिशेब जनतेसमोर ठेवण्यात आलेला नाही. हा प्रकार म्हणजे जनतेच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारण्यासारखाच असून पंचायत राज व्यवस्थेचा उघड अपमान असल्याची टीका CPI ने केली आहे.

CPI ने मागणी केली आहे की, सन २०२३ पासून आजपर्यंत मिळालेल्या सर्व निधीचा तपशील, विकास कामांची कामानिहाय यादी व त्यावरील खर्चाचा संपूर्ण अहवाल तात्काळ लेखी व छापील स्वरूपात जाहीर करण्यात यावा. तसेच ही माहिती ग्रामसभेत मांडून ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर लावावी.

दरम्यान, सेवारी ग्रामपंचायतीचे निलंबित ग्रामपंचायत अधिकारी श्री. मनोज यु. गेडाम यांच्या प्रकरणातही गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचा आरोप आहे. जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या आदेशानुसार त्यांना निलंबित करण्यात आले असून, चौकशी अहवालात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार, कर वसुलीची रक्कम बँकेत जमा न करणे यांसारखे गंभीर आरोप नमूद आहेत.

या पार्श्वभूमीवर CPI ने चौकशी अहवाल तात्काळ सार्वजनिक करण्याची, संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा (FIR) दाखल करण्याची, अपहार केलेल्या रकमेची वसुली करण्याची व त्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

कॉ. सचिन मोतकुरवार यांचे वक्तव्य: “सेवारी ग्रामपंचायतीतील हा प्रकार म्हणजे जनतेच्या हक्कांची सरळ लूट आहे. प्रशासन जर खरंच जनतेच्या बाजूने असेल, तर तात्काळ कारवाई करून सर्व हिशेब जाहीर करावा व दोषींना कठोर शिक्षा द्यावी. अन्यथा प्रशासनही या गैरव्यवहाराला संरक्षण देत आहे, असा स्पष्ट संदेश जनतेमध्ये जाईल. CPI जनतेच्या हक्कासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.”

प्रशासनावर प्रश्नचिन्ह:
CPI च्या या निवेदनावर पंचायत समिती एटापल्लीचे गटविकास अधिकारी तत्परतेने कारवाई करणार की नेहमीप्रमाणे टाळाटाळ करून जनतेला न्याय नाकारणार, याबाबत मोठी शंका व्यक्त केली जात आहे. प्रशासनाची भूमिका पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार असून, जनतेचे लक्ष आता BDO कार्यालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.

CPI ने इशारा दिला आहे की, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पंचायत समिती एटापल्ली समोर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल.

हे निवेदन CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार व कॉ. सुरज जककुलवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून, सेवारी गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन देताना सोबत होते आणि या लढ्याला जोरदार पाठिंबा दर्शविला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.