▪️मुल येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न..
▪️प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्क वेळेत मिळाला तरच अभियानाचे खरे यश : आ. सुधीर मुनगंटीवार

डॉ.आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत, पारदर्शकपणे आणि सन्मानाने पोहोचविणे, हेच ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’चे खरे उद्दिष्ट आहे. समाधान शिबिर ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून जनतेच्या दारी शासन पोहोचविण्याचा लोकाभिमुख संकल्प आहे. नागरिकांना त्यांच्या हक्कासाठी शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, प्रलंबित अर्जांना शिबिराची वाट पाहावी लागू नये. प्रत्येक गरजू व्यक्तीला त्याचा हक्क वेळेत मिळाला, तरच या अभियानाचे खरे यश ठरेल,” असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मुल तहसील कार्यालय येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले,उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार मृदुला मोरे, नगराध्यक्ष एकता समर्थ, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, मुख्याधिकारी संदीप दोडे, पोलीस निरीक्षक विजय राठोड, नगरसेविका अश्विनीताई निकोडे, नगरसेविका प्राची आक्केवार, तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी २१ जुलै या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. २१ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवत मानवजातीच्या इतिहासात नव्या युगाची सुरुवात केली. विज्ञान, संशोधन आणि मानवी जिद्दीचा गौरव करणारा हा दिवस प्रगती, नवकल्पना आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा देणारा असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.
विभागाच्या वतीने आयोजित प्रदर्शनात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कृषी अवजारे व बँक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उमेद अभियान, उपजिल्हा रुग्णालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, महावितरण, कृषी विभाग, संजय गांधी निराधार योजना, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, भूमी अभिलेख विभाग तसेच विविध शासकीय योजनांच्या स्टॉलला भेट देऊन लाभार्थी आणि अधिकाऱ्यांशी संवाद आ.मुनगंटीवार यांनी साधला.
यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी आदेश, सनद, धनादेश, शिधापत्रिका, कृषी अवजारे तसेच इतर लाभांचे वितरण करण्यात आले. यामध्ये २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणांचे नियमानुकूल पट्टे, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे आदेश, जिवंत सातबारा व वारसाहक्क नोंदी, प्रलंबित फेरफार निकालानंतर दुरुस्त सातबारा व ८-अ उतारे, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य धनादेश, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे मंजुरी आदेश, मुख्यमंत्री सहायता निधीचे धनादेश, भूमी अभिलेख विभागाच्या सनदा, अंत्योदय शिधापत्रिका, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कृषी अवजारे व साहित्य तसेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात शंभर टक्के काम पूर्ण करणाऱ्या बीएलओंना प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.



