◼️सिंदेवाहीतील नव्या उडान पुलाला “शहीद बाबुराव शेडमाके” यांचे नाव देण्याची मागणी

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:(इंडिया २४ न्यूज)
सिंदेवाही रेल्वे स्टेशन मार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर उभारण्यात येत असलेल्या नव्या उडान पुलाला शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री कैलास कुमरे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके हे १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक महान क्रांतिकारक होते. त्यांनी संयुक्त चंद्रपूर जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा उभा करून, जल, जंगल आणि जमीन, तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी मोलाचे बलिदान दिले. त्याच्या कार्याची नोंद भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षराने झाली आहे.
सध्या सिंदेवाही रेल्वे स्टेशन मार्गावर तसेच तालुका व पंचायत समिती कार्यालयासमोर उडानपुलाचे बांधकाम सुरू असून, या पुलाला चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे. असे स्थानिक नागरिकासह आदिवासी समाजाची तिव्र भावना आहे. या पुलाला त्याचे नाव दिल्यास भावी पिढ्यांना त्याच्या पराक्रमाची व बलिदानाची प्रेरणा मिळेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून उडानपुलास “शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव शेडमाके उडानपूल” असे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी विविध सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये सुनील पेंदाम (ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन) मुरलीधर मडावी (भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा) विजयकुमार सयाम (तालुका आदिवासी विकास परिषद) वसंत शिडाम (राणी दुर्गावती विकास संस्था) जितेंद्र नागदेवते, अरविंद शिडाम, जयंत नैताम यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश होता.
सदर निवेदनाच्या प्रती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके तसेच राज्यातील इतर संबंधित प्रतिनिधींना पाठविण्यात आल्या आहेत.



