आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आणि सामर्थ्य निर्माण करणारे केंद्र ठरावे. : आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार

▪️रामनगर मुख्य बाजार स्थळावरील धान्य बाजारामधील सिमेंट काँक्रीट रोड व भूमिगत नालीचे लोकार्पण..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 19 – कृषी उत्पन्न बाजार समिती ही ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणारी महत्त्वपूर्ण संस्था असून ती केवळ शेतकऱ्यांच्या कृषी मालाच्या खरेदी–विक्रीपुरती मर्यादित राहता कामा नये. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसोबत त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी, समाधान आणि सामर्थ्य निर्माण करण्याचे केंद्र म्हणून तिची भूमिका अधिक सक्षम व्हावी, असा ठाम विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण, दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता, पुरेशा पतपुरवठ्याची सुविधा, तसेच शेतमाल थेट उद्योगांपर्यंत पोहोचवून अधिक उत्पन्न मिळवून देण्याच्या दिशेने समितीने काम करावे. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणारे प्रभावी केंद्र म्हणून बाजार समिती विकसित व्हावी, अशी अपेक्षा आ.मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य बाजारामधील सिमेंट काँक्रीट रस्ता व भूमिगत नालीचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही मागणी पूर्णत्वास येत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे. 1 कोटीपेक्षा जास्त निधी खर्च करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सेवेसाठी येथील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अधिकृत उद्घाटन व लोकार्पण झाले. चंद्रपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यादींमध्ये यावी यासाठी उत्तम कार्य करण्याची आवश्यकता आहे. ही समिती केवळ शेतकऱ्यांच्या कृषी मालाची खरेदी–विक्री करणारे केंद्र न राहता त्यांच्या उत्पन्नवाढीला, तसेच त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आणि समाधान निर्माण करण्यासाठी कार्यरत असावी. शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण, उत्कृष्ट बियाण्यांची उपलब्धता, पतपुरवठा, तसेच शेतमाल उद्योगांपर्यंत पोहोचवून अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल यासाठी मदत करणे, उत्पादन खर्च कमी करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारे केंद्र व्हावे, असेही ते म्हणाले.

सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांच्या हिताच्या प्रत्येक उपक्रमाची आज जास्तीत जास्त गरज आहे. देशाला समृद्धीकडे न्यायचे असेल, विषमता दूर करायची असेल तर शेतीमधील उत्पन्न वाढून ती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होणे अत्यावश्यक आहे. भारतातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून असून शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो. याचदृष्टीने पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अजयपूर येथे 10 एकर परिसरात आधुनिक शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. तसेच मुल येथे कृषी महाविद्यालयाची मंजुरी मिळवून दिली असून त्या महाविद्यालयाचे उभारणीचे कामही जलद गतीने सुरू आहे. राज्य सरकारने सुरू केलेली पोखरा योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी आहे. याशिवाय दरवर्षी तब्बल 5 हजार कोटी रुपयांची कृषी समृद्धी योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. बियाण्याच्या कायद्यावरील अशासकीय विधेयक विधानसभेत मांडण्यात येणार असल्याचेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले, यापूर्वी कृषी कार्यालयाला संगणक खरेदीसाठी 22 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक वाहने देखील लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे शेतीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण विषय ते सोडविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या समस्यांचे मार्गदर्शन करणारे केंद्र ठरेल, धानाच्या बोनस संदर्भात 25 मार्च 2025 रोजी शासन निर्णय काढला. धानाच्या प्रलंबित बोनसच्या प्रश्न तत्परतेने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही देत कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी कृषी क्रांतीची दिशा ठरवणारा महत्त्वाचा पाया ठरेल.अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाकडून विशेष निधी मिळवून कृषी कार्यालय परिसरात आधुनिक कृषी इमारत उभारण्यात आली. तसेच कृषी हाट उभारण्याचे कामही सुरू असून, या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण आणि त्यांच्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती भविष्यात शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारे, त्यांना सक्षम आणि समृद्ध करणारे प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.