▪️लोकसेवक संजय पाटील मारकवार यांच्या स्मूती दिनानिमित्त रक्तदान शिबीर ३७ रक्तदात्यांनी दिले अमूल्यदान..

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल पंचायत समितीचे माजी सभापती व तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सतत लढणारे, काँग्रेस पक्षातील प्रामाणिक आणि निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्व. संजय पाटील मारकवार यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त आज मूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजकारणातील त्यांची सेवा आणि लोकाभिमुख कार्याला अभिवादन करण्याच्या दृढ संकल्पाने हा उपक्रम राबविण्यात आला.HDFC बँकेसमोर आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोष सिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, तसेच स्व. संजय मारकवार यांचे जेष्ठ बंधू राजू पाटील मारकवार, अनिकेत संजय पाटील मारकवार मित्र परिवार, विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना वक्त्यांनी स्व. संजय मारकवार यांच्या कार्याची आठवण करुन दिली. समाजातील वंचित घटकांसाठी सुरु केलेले अनेक उपक्रम, विकासकामांसाठी केलेले प्रयत्न आणि लोकांशी असलेली त्यांच्या मनाची जवळीक ही त्यांची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमात अनेक युवक, सामाजिक कार्यकर्ते, महिलांनी सहभाग घेत रक्तदान केले. रक्तदात्यांनी स्व. मारकवार यांच्या स्मृतीला सन्मान देताना “त्यांची कार्यशैली प्रेरणादायी होती, समाजसेवा हा त्यांचा श्वास होता आणि रक्तदान हा त्याच सेवाभावाचा एक भाग आहे” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी होण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते तसेच एच. डी.एफ.सी. बँकेचे अधिकारी व कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी विशेष मेहनत घेतली.



