आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️फसवणूक टाळण्यासाठी सजगतेने व्यवहार करण्याची आवश्यकता आहे : दीपक देशपांडे जागृत ग्राहक राजा, प्रांताध्यक्ष नागपूर

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्यांची भुमिका स्पष्ट करीत आज स्वातंत्र्योत्तर काळात ग्राहक संरक्षण कायदा पारित झाल्याच्या ३९वर्षानंतरही सर्वसाधारण ग्राहकांना न्याय मिळत नसल्याने आमच्या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करुन जनतेला त्यांच्या अधिकारांची जाणीव करून द्यावी लागत आहे ,मात्र जनता आपले अधिकार व हक्क याबाबत जागरुक नसल्याने फसवणूक प्रकार मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. याउलट व्यापारी व विक्रेते संघटित असल्याने सहजगत्या ग्राहकांना फसविले जात आहे आणि म्हणूनच आजच्या परिस्थितीत मतदार राजाआश्वासनांचा बळी,शेतकरी राजा(बळीराजा) वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सहाय्यतेच्या नावावर माफी आणि अनुदानाच्या नावावर विविध प्रलोभनांचा बळी आणि ग्राहक राजा जाहिरातींच्या माध्यमातून शोषण आणि फसवणुकीच्या प्रकारांचा बळी ठरत आहे आणि यावर उपाय शोधायचा असेल तर आमचा ग्राहक राजा जागृत होणे व त्यासाठी जनजागृती होणे ही काळाची गरज आहे आणि शासन व्यवस्था केवळ घोषणाबाजी करीत असून जनजागृती करण्यात सपशेल अयशस्वी ठरत आहे म्हणूनच आम्हाला अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत जनजागृती करावी लागत आहे असेही स्पष्ट केले.
ग्राहक म्हणून आपले काय हक्क आहेत आणि आपले अधिकार जाणून घेऊन ते मिळवण्यासाठी आपण सर्वसामान्य नागरिकांनी सगळे व्यवहार करण्याची , आवश्यकता आहे, आणि त्यासाठी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध वस्तू खरेदी करताना पावतीची मागणी करणे , वस्तू खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख, आणि किती काळापर्यंत ती वापरु शकतो आणि त्या वस्तुंची अधिकतम विक्री किंमत काय आहे हे बघून खरेदी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करताना फसवणूक कशी होते हे सोदाहरण पटवून देण्याचा प्रयत्न दीपक देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यातून केला ,व फसवणूक टाळण्यासाठी सजगतेने व्यवहार करण्याची आग्रही मागणी केली व हीच राष्ट्रसंतांना खरी आदरांजली ठरेल, आणि आपण हे करू शकलो तर आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचे खरे फलीत झाले असे मानता येईल असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी उमाजी दादा मंडलवार मध्यावधी प्रतिनिधी तथा जीवन प्रचारक गुरुकुंज मोझरी हे विराजमान होते तर प्रमुख वक्ता व प्रबोधनकार म्हणून दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत,हे उपस्थित होते. यावेळी मंचावर अशोक मैदमवार उपाध्यक्ष जागृत ग्राहक राजा मूल, रमेश डांगरे सचिव मूल तालुका, डॉ आनंदराव कुळे, कार्यकारिणी सदस्य मूल तालुका ,डोपाजी पाटील कडस्कर अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ चिखली,ह.भ.प.रुषीराज लाटरवार महाराज यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाजी दादा मंडलवार यांनी केले, याप्रसंगी बोलताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याची माहिती देत ह्या विचारांची पेरणी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले नंतर अशोक मैदमवार यांनी राष्ट्रसंतांना अभिवादन करीत ग्राहकाची भुमीका आणि फसवणूक प्रकारांना आळा घालण्यासाठी जागरुकतेची आवश्यकता विशद केली.
रमेश डांगरे यांनी ग्राहक या शब्दाची व्याप्ती आणि ग्राहकाची व्याख्या करताना ग्राहक संरक्षण अधिनियमानुसार प्राप्त अधिकारांची माहिती दिली आणि फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक जागरुकतेचे महत्व स्पष्ट केले. तर डॉ आनंदराव कुळे यांनी ग्राहकांची फसवणूक कशाप्रकारे केली जाते हे वेगवेगळ्या उदाहरणांनी पटवून देत आपण जर सजगतेने व्यवहार केला तर आपली फसवणूक टाळता येते हे स्पष्ट केले.
आभार प्रदर्शन करताना उमाजी दादा मंडलवार यांनी जागृत ग्राहक राजा पदाधिकारी व उपस्थित ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करीत जनतेने आजच्या कार्यक्रमातील मार्गदर्शनाचा लाभ प्रत्यक्ष जीवनात घेण्याचे व फसवणूक टाळण्याचे आवाहन केले, सुत्रसंचालन रुषीराज लाटरवार यांनी केले , याप्रसंगी चिखली येथील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी व चिखली येथील रहिवासी ग्रामस्थ , तरुण तरुणी आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता झाली यानंतर प्रार्थना झाली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.