▪️शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक बेलगाटा येथे संपन्न..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : कृषी महाविद्यालय, मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची तेहेतीसावी बैठक दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी बेलगाटा, ता. मूल, जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूल येथील शास्त्रज्ञांची चमू तसेच गावातील शेतकरी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रस्तुत सभा डॉ. व्ही. जी. अतकरे , सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, मूल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी सर्वप्रथम कीटकशास्त्रज्ञ डॉ. भुषण ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धान व कापूस पिकांमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी रसशोषण करणाऱ्या किडींसाठी पिवळे चिकट सापळे, अळ्यांसाठी कामगंध व प्रकाश सापळे याबद्दल माहिती दिली. तसेच इतर किडींसाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक बुरशीजन्य कीटकनाशकांचा (वर्टिसिलियम लेकॅणी, मेटारायझियम ऍनिसोप्लाए, बेव्हेरिया बेसीआना) वापर कसा करावा हे सांगितले. यानंतर वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. गीतांशु डिंकवार यांनी कापूस, धान आणि भाजीपाला पिकांमध्ये सध्या येणाऱ्या रोगांचे एकात्मिक रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी करपा व मर रोगांचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती दिली. तसेच बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया आणि महत्वाच्या जैविक बुरशीनाशकांबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर मृदाशास्त्रज्ञ डॉ. विशाखा डोंगरे यांनी धान आणि कापूस पिकांमध्ये आढळणाऱ्या विविध अन्नद्रव्यांच्या कमतरतेबाबत व त्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. उद्यान विद्याशास्त्रज्ञ डॉ. आर. पी. गजभिये यांनी शेतकऱ्यांना प्रेरित करताना शेतीतील दररोज भेडसावणाऱ्या अडचणी व त्यावर सहजपणे मात करण्याचे मार्ग सांगितले. तसेच त्यांनी भाजीपाला पिकांच्या लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक पूरक व्यवसाय तसेच विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी पं.दे.कृ.वि. कृषिसंवादिनी बद्दल माहिती दिली. तसेच कृषी महाविद्यालय, मूल अंतर्गत तयार होणाऱ्या गांडूळखत (वर्मी-कंपोस्ट) व वर्मीवॉश याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.सदर शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या सभेकरिता जागृत ग्राहक राजा या संघटनेचे दिलीप उईके,अजय त्रीपत्तीवार यांचेसह गावातील ४८ शेतकरी व ६ शास्त्रज्ञ उपस्थित होते. मार्गदर्शनादरम्यान शेतकऱ्यांनी धान,कापूस, पिक व्यवस्थापना बद्दल बरेच प्रश्न उपस्थित केले या सर्व प्रश्नाचे शास्त्रज्ञानी निराकरण केले. सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. नागेश नवघरे यांनी केले.



