आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कोठारीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. सुधीर मुनगंटीवार

▪️अपर तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय व संत रविदास महाराज सभागृहाचे लोकार्पण; ५ कोटींच्या मुख्य सिमेंट रस्त्याचे आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : कोठारीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; मात्र प्रत्येक विकासकाम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकाळ टिकणारे झाले पाहिजे, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशी स्पष्ट ग्वाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कोठारीच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे लोकार्पण आणि नव्या विकासकामांचे भूमिपूजन आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. अपर तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, नमो सचिवालय (ग्रामपंचायत) इमारत, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय आणि संत रविदास महाराज सभागृहाचे लोकार्पण तसेच ५ कोटी रुपये खर्चाच्या मुख्य सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. कोठारीवासीयांनी लाडुतुला करत आ. मुनगंटीवार यांचे प्रेमाने व उत्स्फूर्त उत्साहात स्वागत केले. यावेळी भव्य तिरंगा रॅलीही काढण्यात आली.

यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व महापुरुष आणि शहीदांना अभिवादन केले. तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाला शुभेच्छा देताना ते म्हणाले की, आदिवासी समाज हा परिश्रमी, पराक्रमी, कष्टकरी आणि विशेषतः निसर्गपूजक समाज आहे. निसर्गाचे शोषण न करता त्यामध्ये ईश्वराचा अंश शोधणाऱ्या या समाजाचा आत्मविश्वास वाढावा, त्यांची प्रगती, विकास आणि उन्नती व्हावी, यासाठी देशभर तसेच जगभर जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. कोठारीतील नागरिकांनी प्रेमाने आणि उत्साहाने केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

बल्लारपूर मतदारसंघातील मतदारांनी दिलेल्या संधीमुळे जनसेवेची अनेक कामे करता येत आहेत,” असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी कोठारीच्या मुख्य रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. रस्त्याच्या कामासाठी निधी कमी पडत असल्यास तो उपलब्ध करून देऊ; मात्र रस्ता दर्जेदार आणि टिकाऊ झाला पाहिजे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या माध्यमातून कोठारीतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यावर आ. मुनगंटीवार यांनी भर दिला. वाचनालयासाठी पुस्तके, पुस्तिका, अलमारी, वातानुकूलित व्यवस्था आणि सोलार सुविधेसाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.कोठारीच्या वाचनालयातून अभ्यास करून एखादा गुणवान विद्यार्थी पुढे जाऊन कोठारीचा गौरव वाढवेल, असे सुंदर व सर्व सुविधांनीयुक्त वाचनालय उभारले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी मी उपलब्ध करून देईन,” असे आश्वासन त्यांनी दिले.

मिशन ऑलिम्पिक २०३६ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. बल्लारपूर स्टेडियममध्ये ८.५० कोटी रुपये खर्चून धनुर्विद्या केंद्र उभारण्यात येत असून, चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाने ऑलिम्पिक २०३६ मध्ये देशासाठी सुवर्णपदक मिळवावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोठारी येथे क्रीडांगणासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना तहसीलदारांना देत, जागा उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक सुविधा विकसित करून क्रीडांगण उभारण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठारी परिसरातील नागरिकांना बल्लारपूर येथे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी कोठारी येथेच यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी या योजनेचे अर्ज एकत्रित करून त्यांचा पाठपुरावा करावा आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आ.मुनगंटीवार यांनी निर्देशित केले.

पळसगाव-आमडी उपसा जलसिंचन योजनेचा उल्लेख करत आ. मुनगंटीवार यांनी आमडी येथे बॅरेज उभारण्याच्या निर्णयाची माहिती दिली. उपसा जलसिंचन योजनेत पाणी उपलब्ध होण्यासाठी वर्धा नदीवर बंधारा उभारणे आवश्यक आहे. आमडी बॅरेज झाल्यास कोठारी, पळसगाव, किन्ही, इटोली, कळमना, दहेली, बामणी आणि नवी दहेली या गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा लाभ मिळणार आहे.सिंचन सुविधा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेता येतील. “विकेल ते पिकेल” या संकल्पनेच्या माध्यमातून शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची गरज असून, शेतीला मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय बनविण्याचे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली असून त्याचा योग्य फायदा घेत शेती अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. धानाच्या बोनससाठी आपण आग्रही मागणी राज्य शासनाकडे करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोठारीतील महिलांच्या पाच ग्रामसंघांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याच्या दृष्टीनेही आ. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. या इमारतीमध्ये पाचही ग्रामसंघांसाठी स्वतंत्र कार्यालये तसेच एक सभागृह असावे, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या. महिलांच्या संघटनांना एकत्रितपणे काम करता यावे, त्यांच्या उपक्रमांना चालना मिळावी आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही इमारत उभारण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.कोठारीमध्ये यापूर्वी विविध सामाजिक सभागृहांच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, अपर तहसीलदार संदीप पानमंद, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपविभागीय अभियंता संजोग मेंढे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, उपअभियंता (विद्युत) भूषण येरगुडे, पोलीस निरीक्षक योगेश खरसान, सरपंच अश्विनी वासमवार, उपसरपंच सुनील फरकाडे, माजी सभापती राजू बुद्धलवार, वैशाली बुद्धलवार, गंगाधर वैद्य, स्नेहल टिंबडिया, किशोर पंदीलवार, किशोर कोटरंगे, पिंटू बुटले, अनिल मोरे, गणेश टोंगे आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.