◼️सिंदेवाही परिसरातील विद्युतपुरवठ्याबाबत नागरिकांची तक्रार

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही 🙁 इंडिया २४ न्युज ) मागणी करूनही सिंदेवाही वीज वितरण उपविभागाकडून अपेक्षित सेवा मिळत नसल्याचा आरोप करत वासेरा येथील ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंत्याकडे तक्रार दाखल केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वासेरा गावातील विजपुरवठा वारंवार खंडित होत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण गाव अंधारात राहते. संबंधित लाईनमन गावात वास्तव्यास नसल्याने वीजपुरवठ्यातील बिघाड तातडीने दूर करण्यात अडचणी येत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
तक्रारीत लाईनमनकडून ग्राहकांना चुकीचे उत्तरे दिली जात असल्याचा, तसेच काही शेतकरी वीज चोरी करत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. घरगुती वीजमीटर घेण्यासाठी पंचनामा प्रमाणपत्राच्या नावाखाली पैसे मागितले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वासेरा येथे कार्यरत असलेल्या कुमारी सुलभा राजुरकर यांच्या कामकाजाबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे गावातील वीजपुरवठा दिवसातून तीन ते चार तास खंडित होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यामुळे सुलभा राजुरकर यांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी पुरुष कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. तसेच वासेरा गावाला सुरळीत वीजपुरवठा मिळावा आणि नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



