▪️मूल नगरपरिषदेवर राकेश रत्नावार यांची पाचव्यांदा उपाध्यक्ष पदी..
बंडू गुरनुले व गुलाबखा पठाण यांची स्वीकृत सदस्य पदावर अविरोध निवड..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज) : गेल्या १४ वर्षांच्या भाजपाच्या राजवटीनंतर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या वीस सदस्यीय मूल नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे गटनेते राकेश रत्नावार यांची तर गुलाबखॉ दिलदारखॉ पठाण आणि बंडु शशीकांत गुरनूले यांची स्वीकृत सदस्य पदावर आज बिनविरोध निवड झाली.
नगर परिषदेचे उपाध्यक्ष आणि दोन नामनिर्देशित सदस्य निवडी करीता नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर परिषद सभागृहात सभा पार पडली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अजय चरडे आणि मुख्याधिकारी संदीप दोडे उपस्थित होते. अलीकडेच झालेल्या मूल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी मंत्री,विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार, जिल्ह्याच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे मार्गदर्शनात आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांचे कुशल खंबीर नेतृत्वात काँग्रेसने वीस पैकी अठरा जागांवर विजय मिळवित नगर परिषदेवर एक हाती सत्ता मिळवली. भाजपाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. निवड करावयाच्या दोन नामनिर्देशित सदस्यांच्या निवडणुकी करीता गटनेते राकेश रत्नावार यांनी गुलाबखॉ दिलदारखॉ पठाण आणि बंडु शशीकांत गुरनूले यांचे नांव प्रस्तावित केले होते. गुलाबखॉ पठाण आणि बंडु गुरनूले यांचे नांवाशिवाय दुसरे कोणतेही नांव समोर न आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी अजय चरडे यांनी नामनिर्देशित सदस्य म्हणून गुलाबखॉ पठाण आणि बंडु गुरनूले यांच्या नांवाची घोषणा केली. गुलाबखॉ पठाण आणि बंडु गुरनूले यांच्या निवडीमूळे नगर परिषदेत काँग्रेसचे संख्याबाळ आता वीस झाले आहे. आज शांततेत पार पडलेल्या नगर परिषदेच्या पहिल्या सभेला काँग्रेसचे अठराही सदस्य उपस्थित होते. भाजपाचे दोन सदस्य अनुपस्थित होते.
कित्येक वर्षानंतर मूल नगर परिषदे मध्यें मुस्लीम धर्मिय व्यक्तीला काँग्रेसने प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्याने मुस्लीम धर्मीयांनी काँग्रेस नेतृत्वाप्रती आभार व्यक्त केले आहे.वयाच्या २२ व्या वर्षीपासून राजकिय क्षेत्रात पदार्पण करणारे,संघटन कौशल्य व चाणक्य नीतीने राजकारण करणारे राकेश रत्नावार पाचव्यांदा नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले आहेत. यापूर्वीही त्यांनी नगर परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती म्हणून उल्लेखनीय कार्ये केले असून दांडगा जनसंपर्क असलेले राकेश रत्नावार सध्यास्थितीत मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही कार्यरत आहेत.



