▪️कृषि महाविद्यालय, मूलतर्फे आदर्शगाव राजगड येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन..
▪️चांगली गोष्ट मिळावीण्यासाठी अथक मेहनत करावी-श्रीमती जयश्रीताई गुज्जनवार, गट शिक्षणाधिकारी..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : आदर्श गाव राजगड येथे कृषि महाविद्यालय, मूल अंतर्गत सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे विशेष शिबिर दिनांक ३ जानेवारी ते ९ जानेवारी, २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. कृषि महाविद्यालय, मूल आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा उद्घाटन समारंभ दिनांक ४ जानेवारी, २०२६ रोजी राजगड, ता. मूल, जि. चंद्रपूर येथे सहयोगी अधिष्ठाता,डॉ.विलास अतकरे,कृषि महा. मूल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्रीमती जयश्रीताई गुज्जनवार, विस्तार अधिकारी (शिक्षण) या उद्घाटक म्हणून लाभल्या. तसेच श्री. रविंद्र चौधरी, सरपंच, राजगड आणि श्री. चंदूपाटील मारकवार, उपसरपंच, राजगड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी व प्रतिष्ठित गावकरी मंडळी तसेच कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना श्रीमती जयश्रीताई गुज्जनवार यांनी विद्यार्थ्यांना परिश्रमाचे महत्त्व सांगत, “चांगली गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत करावी लागते, मेहनतीशिवाय पर्याय नाही,” असे मत व्यक्त केले. तसेच मागील तीन वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. श्री. रविंद्र चौधरी सरपंच,राजगड यांनी स्वयंसेवकांना पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. उपसरपंच श्री. चंदूपाटील मारकवार यांनी आपल्या २५ वर्षांच्या सामाजिक कार्याच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना अपयशाला न घाबरता सकारात्मक दृष्टिकोनातून वाटचाल करण्याचा संदेश दिला. विकासात्मक दृष्टीकोनातून आदर्श गाव घडविण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. रमाकांत गजभिये, वरिष्ठ प्राध्यापक (उद्यानविद्या), कृषि महाविद्यालय, मूल यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार मांडत, राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले व विद्यार्थ्यांना या विशेष शिबिरात तत्परतेने सहभाग घेण्याचे आवाहन केले.
डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, मूल यांनी अध्यक्षीय भाषणात थोर पुरुष व संतांच्या समाजकार्यावर प्रकाश टाकत आदर्श गाव राजगडसाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच शिबिरासाठी वेळेत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल गावचे सरपंच व उपसरपंच यांचे आभार मानले आणि स्वयंसेवकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या शिबिराअंतर्गत ग्रामस्वच्छता दिंडी, विविध विषयांवर जनजागृती, विद्यापीठाच्या नवीन कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार, पथनाट्य सादरीकरण, आरोग्य तपासणी शिबिर, जनावरांचे लसीकरण तसेच गावकऱ्यांसाठी मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रा. से. यो. विशेष शिबीर उद्घाटनप्रसंगी राजगड ग्रामपंचायत मार्फत सरपंच व उपसरपंचांच्या हस्ते जि. प. उच्च प्राथमिक शाळा, राजगड येथील विद्यार्थ्यांना सहा टॅब्लेट वितरीत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एन. घोंगे मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान, प्रास्ताविक डॉ. आशीष लाडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तर आभारप्रदर्शन डॉ. सुवर्णा नगराळे, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र यांनी केले.


