◼️ मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून द्यावा, मजुरांची मागणी

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज): दि.२१/०२/२०२६
“मागेल त्याला काम” या मथळ्याखाली शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत आजपर्यंत ग्रामीण मजुरांना विविध प्रकारची कामे उपलब्ध करून दिली. या योजनेमध्ये ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आणि कुटुंबाच्या हाताला नियमित काम मिळाले. जलसंधारण, वृक्ष लागवड, रस्ते दुरुस्ती, तलाव खोलीकरण अशा विकास कामामुळे गावाचा विकासही साध्य झाला.
परंतु सन २०२६ मध्ये कोणत्याही प्रकारची नवीन कामे सुरू न झाल्याने मजुरापुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. रोजगाराच्या अभावामुळे अनेक मजुरांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे. गावात काम उपलब्ध नसल्याने ते शहराकडे किंवा इतर राज्याकडे वळत आहेत. ज्यामुळे सामाजिक व आर्थिक अडचणी वाढत आहेत.
म्हणूनच “मागेल त्याला काम” या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. शासनाने मनरेगा अंतर्गत प्रलंबित कामे तातडीने सुरू करून, ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.


