◼️कच्चेपारमध्ये विजेचा लपंडाव; नागरिक संतप्त, महावितरणकडून तातडीच्या उपाययोजनाची मागणी

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:( इंडिया २४ न्यूज)
सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार गावात वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त होत आहे. सततच्या विज लपंडावामुळे गावकऱ्याचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, विशेषतः शेतकऱ्याच्या शेती पंपावर मोठा विपरीत परिणाम होत आहे.
दरम्यान आगामी काळात तापमान ४७ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विज नसल्यामुळे लहान मुलावरही विपरीत परिणाम होत असून, उष्णतेमुळे त्यांना झोप न लागणे, रात्रभर रडणे अशा समस्या निर्माण होत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीतीही पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
कच्चेपार हे गाव जंगलाचे मध्यभागी असल्याने मानव व वन्यप्राणी संघर्षाची परीस्थिती निर्माण झाली आहे. अंधाराचा फायदा घेऊन वाघ, बिबट्या सारखे हिंस्त्र प्राणी, गावात प्रवेश करण्याची शक्यता असून, त्यामुळे जिवितहानीचा धोका नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने तातडीने दखल घेऊन कच्चेपारसह संपूर्ण सिंदेवाही तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.



