▪️जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार
▪️तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुल, बल्लारपूर, पोंभूर्णा, चंद्रपूरसह अनेक तालुक्यांतील शेती, घरे, जनावरे, शेतबांध, रस्ते तसेच वर्धा व इरई नदीकाठच्या गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची गंभीर दखल घेत आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून तात्काळ पंचनामे करून बाधितांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), अतिरिक्त मुख्य सचिव (मदत व पुनर्वसन) तसेच मुख्य सचिव आणि महसूल आयुक्त (नागपूर) यांना पत्र पाठवून चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती देत नुकसान भरपाई देण्यासंदर्भाची मागणी केली आहे. यासोबतच चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
पत्रात आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पाण्याखाली गेली असून उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी घरे, गोठे, शेतबांध, रस्ते व इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. वर्धा आणि इरई नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरून शेतीसह गावांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने संयुक्त पाहणी करून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करावेत आणि शासनाच्या नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई अदा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्या भागांसाठी विशेष मदत जाहीर करून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचीही आ.मुनगंटीवार यांनी मागणी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना तातडीने दिलासा मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच शासनाने या गंभीर परिस्थितीची संवेदनशीलतेने दखल घेऊन तातडीने आवश्यक निर्णय घ्यावेत, असे पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, या संकटाच्या काळात एकही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गावागावात जाऊन नुकसानग्रस्तांना मदत करावी, प्रशासनाला पंचनाम्यांसाठी सहकार्य करावे आणि पात्र लाभार्थ्यांचे नुकसान शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळेल, नुकसानभरपाईची प्रक्रिया गतिमान होईल आणि संकटग्रस्त कुटुंबांना त्वरित दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



