आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जगन्नाथ बाबा वार्डातील वैष्णवी अपार्टमेंटमधील दोन बिअर शॉपी बंद करण्याची नागरिकांची मागणी..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहरातील दाताळा रोड परिसरातील जगन्नाथ बाबा वार्ड येथील वैष्णवी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या पी.जे. बिअर शॉपी व पी.जी. बिअर शॉपी या दोन मद्यविक्री दुकानांविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोन्ही दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस महासंचालक, मुंबई यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मागील तीन ते चार वर्षांपासून सुरू असलेल्या या दोन्ही बिअर शॉपींमुळे परिसरातील शांतता व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी लवकरपासून रात्री उशिरापर्यंत येथे मद्यपींची गर्दी होत असून, दुकानांसमोरच दारू पिणे, अश्लील शिवीगाळ करणे, भांडणे करणे, रस्त्यावर वाहने उभी करणे, प्लास्टिक ग्लास व कचरा फेकणे तसेच सार्वजनिक ठिकाणी लघवी व उलट्या करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, या परिसरात अनेक शाळा, कॉन्व्हेंट, मंदिर तसेच निवासी कुटुंबे असून वैष्णवी अपार्टमेंटमध्ये सुमारे 21 कुटुंबे वास्तव्यास आहेत. अपार्टमेंटसमोर लहान मुलांचे कॉन्व्हेंट असून मागील भागात हनुमान मंदिर आहे. याच मार्गावरून विद्यार्थी, पालक व शाळा बसेसची सतत वर्दळ असते. त्यामुळे अशा प्रकारच्या वातावरणाचा लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी असा आरोप केला आहे की, संबंधित बिअर शॉपींना सोसायटीची परवानगी नसतानाही दुकाने सुरू ठेवण्यात आली असून, दुकानांसमोर टिनाचे शेड व गेट उभारून अतिक्रमण करण्यात आले आहे. या शेडमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बाहेरील युवकांनी भरदिवसा दारू-मटन पार्टी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, येथील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे, या चर्चेलाही परिसरात उधाण आले आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी तक्रारीनंतर काही काळ दुकानांवर सील लावण्यात आले होते. मात्र, नंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने आता कायमस्वरूपी उपाययोजना करून दोन्ही बिअर शॉपी बंद कराव्यात, अशी मागणी होत आहे.

या प्रकरणात स्थानिक नगरसेवक व आमदारांनीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून, “फक्त मतांसाठीच लोकप्रतिनिधी येतात काय?” असा संतप्त सवालही रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

नागरिकांनी पोलिस प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग व महानगरपालिका यांनी संयुक्त पाहणी करून परिसरातील परिस्थितीची दखल घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.