चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : “योग असे जिथे, आरोग्य वसे तिथे..!” हा संदेश देत आज रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे “जागतिक योग दिवस” अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष “योगोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा पोलीस यांच्या वतीने लोकमत सखी मंच, “द आर्ट ऑफ लिविंग” (The Art of Living) आणि “श्री श्री स्कूल ऑफ योग” (Sri Sri School of Yoga) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात श्री आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक सा. चंद्रपूर यांच्या समवेत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित सर्वांनी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसाधना केली. पोलीस दलातील धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत शारीरिक सुदृढता व मानसिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करणे किती गरजेचे आहे, यावर या प्रसंगी विशेष भर देण्यात आला.



