◼️आलेवाही रस्त्यावर वीज खांबाचा जीव घेणा धोका; महावितरणच्या दुर्लक्षामुळे अपघाताची शक्यता….

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही 🙁 इंडिया २४ न्युज )
उपविभाग सिंदेवाही अंतर्गत आलेवाही रस्त्याच्या कडेला महावितरणच्या विद्युत वाहिनीचा एक खांब वरच्या भागातून पूर्णपणे तुटलेला अवस्थेत असून, तो सध्या लोखंडी अँगलच्या आधारावर उभा आहे. सदर खांबाची अवस्था अत्यंत धोकादायक असून, एखाद्या क्षणी खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आलेवाही रस्त्यावरून नागरिकांची तसेच वाहनाची नियमित वर्दळ असते. अशा ठिकाणी विद्युत खांब तुटलेल्या अवस्थेत अनेक दिवसापासून उभा असल्याचे दिसून येत आहे. खांबाला लोखंडी अँगलचा आधार देण्यात आला असला तरी हा आधार कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
महावितरणचे कर्मचारी आणि संबंधित लाईनमन या मार्गावरून ये – जा करीत असताना ही धोकादायक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आली नाही का? असा सवाल नागरिकाकडून उपस्थित केला जात आहे. दुर्घटना घटल्यानंतरच दुरुस्ती करण्याची वाट पाहिली जात आहे का, असा संतप्त सवालही नागरिक करीत आहेत.
विद्युत वाहिन्या व खांबाशी संबंधित दुर्घटना गंभीर ठरू शकतात. त्यामुळे संबधित महावितरण अधिकार्यांनी या धोकादायक खांबाची तातडीने पाहाणी करून नवीन खांब उभारावा अथवा आवश्यक ती कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
” अनर्थ घडण्यापूर्वी महावितरण जागे होणार का? ” असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.



