◼️ धान उत्पादक विदर्भावर मोठे संकट; पावसाच्या लपंडावामुळे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील शेतकरी हतबल….

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:🙂 इंडिया २४ न्युज )
विदर्भाचा धान पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या चारही जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत गंभीर संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ्यात नद्या, नाले आणि सिंचनाचे मुख्य आधार असलेले तलाव कोरडेच राहिल्याने धान उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत.
▪️पावसाची ओढ आणि कोरडे तलाव▪️
यावर्षी मान्सूनने दगा दिल्याने या चारही जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झाला आहे. धान पिकाच्या वाढीसाठी आणि रोवणीच्या काळात भरपूर पाण्याची गरज असते. मात्र, हक्काचे सिंचन स्त्रोत असलेले पाण्याचे तलाव अद्याप भरलेले नाहीत. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
▪️ महागात पडलेली रोवणी आणि खताचा खर्च▪️
पाऊस नसल्यामुळे शेतीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक भागात रोवणी रखडली आहे, तर काहींनी कसेबसे ट्युबवेल किंवा उपलब्ध पाण्याचा आधार घेऊन रोवणी उरकली आहे. मात्र, या खटाटोपात रोवणीचा आणि खतांचे वाढीव दर, खतांचा झालेला भरमसाठ खर्च कसा निघणार असा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.
▪️कर्जाचे डोंगर आणि मदतीची प्रतिक्षा▪️
उत्पादनाची कोणतीही शाश्वती नसताना अनेक शेतकऱ्यांनी बँका आणि सोसायटीकडून तसेच खाजगी सावकाराकडून कर्ज काढून रोवणी केली आहे. आता पीक हातात येणार की नाही, या चिंतेत असलेले शेतकरी “काढलेले कर्ज फेडायचे कसे?” या विवंचणेत पूर्णपणे खचले आहेत.
▪️प्रशासन आणि शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी▪️
° दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करणे:
विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यात निर्माण झालेल्या या बिकट परिस्थितीची दखल घेऊन शासनाने तात्काळ दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करावी.
° कर्ज वसुलीला स्थगिती:
शेतकऱ्यावरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी तात्काळ शेती कर्जाचे पुनर्गठण करून वसुली थांबवावी.
° हेक्टरी आर्थिक मदत:
संकटकाळात हातभार लावण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी भरीव नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी, अशी आर्त हाक शेतकरी वर्ग देत आहेत.
” अगोदरच कर्ज काढून रोवणी केली, पण आता तलाव कोरडेठाक आहेत आणि पाऊसही मिळेनासा झालाय, रोवणीचा खर्चही निघणार नाही, मग पोराबाळांना कसं जगवायचं आणि कर्ज कसं फेडायंच, हा प्रश्न आम्हाला झुरवून मारतोय, ” अशी प्रतिक्रिया एका हतबल शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे.
सध्याच्या या भिषण परिस्थितीत प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांना धीर देण्याची आणि तातडीने उपाय योजना राबवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.



