आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कृषीपंपाची कार्यक्षमता वाढविण्याकरीता कॅपेसिटर बसविण्याबाबत मा.मुख्य अभियंता यांचे शेतकऱ्यांना आवाहान..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : २ सप्टेंबर २०२६:- प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषीपंपास योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर बसवावे जेणेकरून शेतकऱ्यांचे कृषीपंपास योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळविण्यास मदत होईल असे आवाहन मा. मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे यांनी केले आहे.
सद्यस्थितीत जवळपास एक ते दीड महिन्यांपासुन पावसाने दडी मारल्यामुळे कृषी पंपाच्या वापरातही मोठया प्रमाणत वाढ झाली आहे. रोहित्रावरिल सर्व कृषी पंप एकाच वेळी सुरु होवून रोहित्रावरील भार अचानक वाढतो.परिणामी रोहित्र जळणे / नादुरुस्त होणे, वीज वाहिन्यांवरील तार तुटणे ह्यासारख्या घटना वारंवार घडत असतात.याची झळ ऐन वेळी शेतकऱ्यांनाही बसते आणि महावितरणलाही बसते असेही ते म्हणाले.
तांत्रिक बिघाडीचे मुख्य कारण
शेतातील कृषी पंपांमध्ये इंडक्शन मोटरचा वापर केला जातो. या मोटारी सुरु असताना अतिरिक्त इंडक्टिव्ह करंट म्हणजेच सुमारे ३० टक्के जास्त करंट वीज वाहिन्यांवरून खेचतात. यामुळे विद्युत वाहिनीवर प्रचंड ताण येऊन मोटार जळणे, ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होऊन जळणे, वारंवार फॉल्ट होणे आणि एलटी लाईन ट्रिप होण्याचे प्रकार घडतात. महावितरणच्या दृष्टीने ही यंत्रणेवारील अतिरिक्त ताणाची आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांची मोठी समस्या ठरते.
कॅपेसिटर का महत्वाचे ?
कॅपेसिटर हे उपकरण पंपाला लागणारी रिॲक्टिव्ह पॉवर थेट पुरवत असल्याने लाईनवरुन वाहणारा अतिरिक्त वीज प्रवाह ३० टक्क्यांनी कमी होतो.यामुळे महावितरणला ग्राहकांना उच्च व योग्य दाबाने अखंडित वीज पुरवठा देणे शक्य होते आणि वीज यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणावर हलका होतो. परिणामी रोहित्र जळणे, वाहिन्या तुटणे यासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळविणे शक्य होते. शिवाय कृषीपंप जळण्याचे प्रमाण कमी होवून कार्यक्षमतेत वाढ होते असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे
नाममात्र खर्चात आणि क्षमतेनुसार कॅपेसिटर उपलब्ध
बाजारात एलटी,कॅपको,हॅवेल्स यासारख्या नामांकित कंपन्यांचे कॅपॅसिटर सहज उपलब्ध आहेत. त्यामध्ये ३ एचपीच्या मोटारीसाठी १ केव्हीएआर, ५ एचपीसाठी २ केव्हीएआर तर ७.५ एचपीच्या मोटारीसाठी ३ केव्हीएआर क्षमतेचा कॅपेसिटर पुरेसा ठरतो. अवघ्या ३०० ते ५०० रुपयांच्या नाममात्र खर्चात मिळणाऱ्या या उपकरणामुळे हजारो रुपयांचाी मोटार जळण्यापासून वाचते. शिवाय ऐन मोक्याच्या वेळी वीज पुरवठा खंडित न होता पिकांना वेळेवर पाणी मिळून उत्पादनात घट होत नाही असे मा. मुख्य अभियंता श्री.हरीश गजबे यांनी सांगितले.
कॅपेसिटर कसे आणि कुठे लावावा
कॅपेसिटर योग्य ठिकाणी लागणे हे देखील महत्वाचे असल्याने, कॅपेसिटर लावतांना ईनकमींग साईडला न लावता मोटरच्या पुर्वी लावावा. म्हणजेच स्टार्टर आणि मोटरला जोडलेली वायर याला लावावा. असे केल्याने जेव्हा जेव्हा मोटार सुरु होणार त्या त्या वेळेलाच कॅपेसिटरचे कार्य सुरु होईल व त्यामुळे कॅपेसिटर कायम सुरु राहणार नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.