आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) वतीने तीव्र मोहीम दोन आरोपीला ठोकल्या बेड्या..

▪️एकूण अंदाजे ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात अमली पदार्थाच्या बेकायदेशीर वाहतूक व विक्रीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) वतीने तीव्र मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बल्लारपूर-बामणी मार्गावर अत्यंत तत्परतेने सापळा रचून ओडिशातून आणलेला सुमारे ५.७४९ किलो गांजा जप्त केला. या धडक कारवाईत दोन आरोपींना जागीच ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गांजासदृश अमली पदार्थ, दोन मोबाईल फोन, रोख रक्कम व अमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरलेले साहित्य असा एकूण अंदाजे ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहर परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पेट्रोलिंग करीत असताना, दोन व्यक्ती बल्लारपूर येथून बामणीमार्गे चामोर्शीच्या दिशेने गांजाची वाहतूक करणार असल्याची गुप्त व विश्वसनीय बातमी पोलिसांना मिळाली होती. या बातमीचे गांभीर्य ओळखून तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवगत करण्यात आले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राजपत्रित अधिकारी व पंचांसमक्ष बल्लारपूर-बामणी मार्गावरील होंडा शोरूम तथा जिओ सेंटर परिसरात सापळा रचण्यात आला.

दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३५ वाजताच्या सुमारास प्राप्त वर्णनाशी मिळत्याजुळत्या दोन संशयित व्यक्ती हातात लाल-काळ्या रंगाच्या बॅगा घेऊन बामणीकडे जाताना आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मंगेश संतोष उंदीरवाडे (वय २३ वर्षे, रा. सोनापूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) आणि सागर बाबूराव मरगडे (वय १९ वर्षे, रा. निमगाव, ता. पवनी, जि. भंडारा) अशी सांगितली. त्यानंतर राजपत्रित अधिकारी आणि पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपींच्या बॅगेत ब्राऊन पॅकिंग टेपने गुंडाळलेली पार्सल्स व सुटा गांजा मिळून आला.

कारवाईत एकूण ५.७४९ किलो गांजा, दोन मोबाईल, रोख ३,८०० रुपये आणि बॅग असा एकूण ३.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिशा राज्यातून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (NDPS Act) च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदर यशस्वी कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश हिवसे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गोरकर, पोहवा सतीश आवठारे, पोहवा इम्रान खान, पोहवा लाले यादव, पोहवा संदीप, पोहवा प्रफुल गारघाटे, पोहवा किशोर वैरागडे, पोहवा हिरालाल गुप्ता, पोअं. किशोर वाकडे, पोअं. शशांक बदामवार, चा.पो.अ. मिलिंद टेकाम तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोहवा कार्तिक खणके यांच्या पथकाने पार पाडली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.