इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही स्थानिक सुट्ट्या देण्याची मागणी; शिक्षक सेनेचे शिक्षण विभागाला निवेदन..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही स्थानिक सुट्ट्यांचा लाभ मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश नायडू आणि जिल्हाध्यक्ष फैयाज अहमद यांनी जिल्हा परिषद चंद्रपूरचे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निवेदन देऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठीही स्थानिक सुट्ट्या स्पष्टपणे जाहीर करण्याची मागणी केली आहे.
शिक्षक सेनेने आपल्या निवेदनात शिक्षण विभागाच्या परिपत्रकाचा संदर्भ देत नमूद केले आहे की, सन २०२६ मधील स्थानिक सुट्ट्यांमध्ये २८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘ज्येष्ठ गौरी पूजन’ या सणानिमित्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांना ही सुट्टी लागू आहे की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने पालक तसेच शाळा प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कुटुंबेदेखील स्थानिक धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक सण-उत्सव साजरे करतात. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांप्रमाणेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही स्थानिक सुट्ट्यांचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे शिक्षक सेनेने निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनामध्ये कोणत्याही प्रकारचा संभ्रम राहू नये, यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठीही स्थानिक सुट्ट्या स्पष्टपणे लागू असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर करावे. अशी मागणी शिक्षक सेनेने केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकारी तसेच शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनाही देण्यात आल्या आहेत.



