आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

महामार्गावर थरार! तीन शेतकऱ्यांचा बळी घेणारा पट्टेदार वाघ चारचाकीच्या धडकेत गंभीर जखमी ; उपचारासाठी नागपूरला रवाना

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही : (इंडिया २४ न्युज) दि.१९ नोव्हें.२०२६
सिंदेवाही तालुक्यातील खातगाव (भेंडाळा) सिंदेवाही – नागपूर महामार्गावर आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी अंदाजे १०.३० वाजता च्या सुमारास एका चारचाकी वाहनाच्या (क्रमांक MH 34 CX 4006) या धडकेत एक पट्टेदार वाघ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यापूर्वी परिसरात तीन शेतकऱ्यांचा बळी घेतल्यामुळे हा वाघ शोध मोहिमेच्या केंद्रस्थानी होता. चंद्रपूर जिल्ह्यातील विशेष पथकाकडून गस्त सुरू होती, तसेच वाघाला पकडण्यासाठी ३०×३० मीटरचा पिंजरा उभारण्यात आला होता.

वाहनाच्या धडकेनंतर जखमी वाघ कसा बसा महामार्गाच्या कडेला असलेल्या झुडपात गेला. मात्र दुखापतीमुळे त्याला जागेवरून हालचाल करता येत नव्हती, घटनेची माहिती मिळतात परिसरातील गावातून हजारो नागरिकांची महामार्गावर मोठी गर्दी जमली. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने तातडीने पावले उचलण्यात आली.

घटनास्थळी राबविण्यात आलेली कार्यवाही

गर्दी नियंत्रण व सुरक्षा: वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) आणि वन कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक लता वाडीवे व त्यांच्या अधिनिस्त पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील प्रचंड गर्दी नियंत्रणात आणली.

संस्थेचे सहकार्य व जाळे उभारणी स्वाब संस्थेचे यश कायरकर व त्याच्या टीमने घटनास्थळी उपस्थित राहून, रेस्क्यू टिम (शूटर) पोहोचेपर्यंत वाघाच्या सभोवताली जाळे लावून परिस्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले.

रेस्क्यू व उपचारासाठी रवानगी: रेस्क्यू पथकाने वाघाला बेशुद्ध (ट्रॅक्विलाईझ) केल्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलविण्यात आले.

सध्या स्थिती व प्रशासकीय नोंद

जखमी वाघाला उपचारासाठी हलविल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी वाघाच्या हल्ल्यातील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. तथापि, वाघाला पुढील उपचारासाठी नेण्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि वन विभागासह संबंधित चारचाकी वाहनाचालका विषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या घटनेची सखोल चौकशी वनविभाग आणि प्रशासकीय स्तरावर होणे अपेक्षित आहे. वन्यजीव व्यवस्थापन व मानव – वन्यजीव संघर्षाच्या संदर्भात अशा प्रकारच्या घटनांमध्ये जबाबदारी निश्चित करताना प्रमुख घटकाकडे लक्ष वेधले जाते.

नियोजन आणि समन्वयाचा अभाव:
चंद्रपूर जिल्ह्यातील विशेष पथक तीन दिवसापासून गस्त घालत असतानाही वाघाच्या हालचालीचा अचूक मागोवा घेण्यात आलेले अपयश हे क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांच्या गस्तीच्या पद्धतीवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

तांत्रिक साधनाचा वापर:
आधुनिक ट्रॅकिंग यंत्रणा (उदा. कॅमेरा, थर्मल ड्रोन) यांचा प्रभावी वापर झाला होता का, आणि वाघ महामार्गाच्या दिशेने येत असल्याची पूर्व सूचना का मिळाली नाही, हा तपासाचा विषय ठरतो.

वाहतूक नियंत्रण व इशारा यंत्रणा:
ज्या भागात वावर होता, त्या सिंदेवाही – नागपूर महामार्गावर वन्यजीव क्षेत्र असल्याचे फलक, वेगमर्यादा नियंत्रण किंवा वन विभागाकडून वाहतूक पोलिसांच्या मदतीने सतर्कतेचा इशारा दिला होता का, हे देखील महत्त्वाचे ठरते.

वाघाचे नैसर्गिक वर्तन:
वन्यप्राणी अनेकदा मानवी अंदाजानां चकवा देऊन अचानक मार्ग बदलतात, मात्र या अनिश्चिततेचा अंदाज बांधून महामार्गासारख्या संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असते.
प्रशासकीय दृष्टीकोनातून या मोहिमेचे नेतृत्व करणारे वरिष्ठ वनाधिकारी आणि संबंधित क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या कार्यपद्धतीचे मूल्यांकन करूनच यातील नेमकी जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. तीन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाच्या जखमी होण्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मानव – वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनविभागाच्या नियोजनावर आणि सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.