▪️श्री संत वासुदेव महाराज पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात व भक्तिरसात न्हालेला अभिष्टचिंतन सोहळा..!

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 3 जुलै 2025 श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोटच्या वतीने आयोजित केलेल्या पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात दिनांक ३ जुलै रोजी भक्तिभावाने व अध्यात्मिक उत्साहाने करण्यात आली. हा महोत्सव पुढील सात दिवस म्हणजेच १० जुलैपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहे.
या पुण्यतिथी महोत्सवाचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष व मार्गदर्शक ह.भ.प. वासुदेव महल्ले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने अतिशय मंगलमय वातावरणात पार पडला. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. नाना महाराज चंदिले (सचिव, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची) हे लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प. सारंगधर महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज चंदिले, समाजसेवक वारकरी गजानन हरणे, ज्ञानपीठ संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव ठाकरे, सहसचिव अवि गावंडे, निमंत्रित सदस्य गजाननराव दुधाट आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. वासुदेव महल्ले व समाजसेवक वारकरी गजानन हरणे यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन औक्षण करत उत्साहपूर्वक गौरव करण्यात आला.
सप्तदिवसीय या महोत्सवात दररोज पहाटे काकडआरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, दुपारी व संध्याकाळी हरिपाठ, कीर्तन, भजन इत्यादी अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन पंढरपूर ,आकोट येथे करण्यात आले असून, या निमित्ताने भाविकांना अनेक नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनांची व प्रवचनांची रसास्वाद घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
विशेष म्हणजे, महोत्सवाच्या दरम्यान सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही सत्रात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तिभावाने नटलेल्या या उत्सवात वारकरी भक्तांचे उपस्थितीत मोठ्या संख्येने दर्शन घडत आहे.
पालखी सोहळ्याचे स्वागत तर एखाद्या जल्लोषात न्हालेल्या उत्सवाप्रमाणे झाले. फटाक्यांची आतिषबाजी, पावल्यांची नृत्यरम्यता, भाविकांच्या गजरांनी वातावरण भारून गेले होते. संपूर्ण परिसर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषांनी दुमदुमून गेला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. अनिल नाराजे यांनी केले, तर उत्कृष्ट निवेदन व कार्यक्रमाचे संचालन ह.भ.प. अंबादास महाराज मानकर (पालखी व्यवस्थापक) यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. आभारप्रदर्शन संस्थेचे सहसचिव अवि गावंडे यांनी करून उपस्थितांचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. संपूर्ण महोत्सव वारकरी परंपरेनुसार भक्तिरसात न्हालेला, अनुशासित व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडत असून, हजारो वारकरी भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागाने भक्तिपर्व अधिकच मंगलमय होत आहे.