ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️रस्ता बांधकामातील माती लेव्हल करणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वारांना चिरडले एका तरुणाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी..

▪️संबंधित कंपनीवर कारवाई होणार की नाही, असा परिसरातील जनतेचा थेट प्रश्न..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : शहराच्या मुख्यालयापासून अवघ्या 7 कि.मी अंतरावर असलेल्या चांदाळा रोडवर आज सायंकाळी सुमारे 5:00. वा. च्या सुमारास रस्ता बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुम पसरविणाऱ्या व माती लेव्हल करणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीस्वारांना चिरडून घटनास्थळावरून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.
मृत तरुणाचे नाव संतोष हिरामण गोमस्कर वय, 29 वर्ष असे असून तो आपल्या वडिलांसह दुचाकीवरून शेतीसाठी खत आणण्यासाठी गडचिरोली शहराकडे जात होता. दरम्यान, चांदाळा रोडवर सुरु असलेल्या रस्ता बांधकामादरम्यान भरधाव वेगाने आलेल्या मुरुम व माती लेव्हल करणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की संतोष गोमस्कर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातात संतोषचे वडील हिरामण सखाराम गोमस्कर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने गडचिरोली सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयीन सूत्रांनुसार, अपघातामुळे त्यांच्या फुफ्फुसात रक्त व हवा साचल्याने श्वसनास गंभीर त्रास होत होता. डॉक्टरांनी तातडीने उपचार करून फुफ्फुसातून रक्त व हवा काढली असून सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
चार दिवसांपूर्वी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू या घटनेमुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे. कारण याच चांदाळा रोडवरील रस्ता बांधकाम करणाऱ्या याच कंपनीच्या एका वाहनाने 4 फेब्रुवारी रोजी अवघ्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीला चिरडून ठार केले होते. त्या घटनेला अवघे चार दिवस उलटत नाहीत, तोच आज पुन्हा याच रस्त्यावर, याच कामातील वाहनामुळे दुसरा जीव गेला आहे. या अपघातानंतर पळ काढलेल्या वाहनाचा पोलिसांनी शोध लावल्याची माहिती मिळाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे संबंधित वाहन चालक व वाहन मालकांची नावे जाहीर न करता ती लपविण्यासाठी कमालीची गोपनीयता पाळली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहन पोलिसांच्या ताब्यात असतांना देखील चालक व मालकांची ओळख जाहीर न होणे, यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
कंपनीवर कारवाई होणार की नाही? सलग दोन प्राणघातक अपघात होऊनही संबंधित रस्ता बांधकाम कंपनीवर अद्याप कोणतीही ठोस व कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळे “आता तरी या कंपनीवर कारवाई होणार आहे की नाही, की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे?” असा थेट सवाल नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित करत आहेत.

पोलिस व रुग्णवाहिकेचा तब्बल तासभर उशीर घटनेनंतर प्रत्यक्षदर्शीनी तातडीने पोलिस व रुग्णवाहिकेला माहिती दिली; मात्र सुमारे एक तासापर्यंत कोणतीही मदत घटनास्थळी पोहोचली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. तब्बल तासाभरानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमीला रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिस आल्यानंतरही जवळपास आणखी एक तास उशिराने
सुरक्षेअभावी अपघातांची मालिका रस्ता बांधकामाच्या ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेड्स, वाहतूक नियंत्रण व वेगमर्यादा यांचा पूर्णपणे अभाव असल्यामुळे अपघातांची मालिका सुरुच असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भरधाव वेगाने धावणारी बांधकाम वाहने निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बळी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कडक कारवाईची जोरदार मागणी. – या भीषण घटनेनंतर नागरिकांनी अपघातास जबाबदार वाहनचालकास तात्काळ अटक करावी, वाहन मालक व रस्ता बांधकाम कंपनीची नावे जाहीर करावीत, संबंधित कंपनीवर फौजदारी स्वरुपाची कठोर कारवाई करावी, रस्ता बांधकाम तात्काळ थांबवून सुरक्षा उपाय लागू करावेत अशी जोरदार मागणी केली आहे.

या अपघातामुळे गोमस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ, भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.