ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पुस्के-मोडस्के-अडंगे परिसरात बेकायदेशीर खदान हालचाली.. नागरिकांचा भाकपाकडे धाव..

▪️कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

एटापल्ली – ( इंडिया 24 न्युज ) : तालुका एटापल्ली अंतर्गत पुस्के-मोडस्के-अडंगे परिसरात बेकायदेशीर खदान सुरू करण्याच्या हालचालींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामसभेची कोणतीही परवानगी न घेता काही अज्ञात व्यक्ती किंवा कंपनीकडून सर्व्हे, ड्रिलिंग, माती खोदकाम व वृक्षतोडीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकाराला विरोध करत नागरिकांनी थेट भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) कडे धाव घेत मदतीची मागणी केली.

सदर परिसर हा CFR (Community Forest Rights) व PESA कायद्यांतर्गत संरक्षित आदिवासी भाग असून कोणतेही विकासकाम किंवा खनिज उत्खनन करण्यापूर्वी ग्रामसभेची पूर्वसंमती घेणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, या सर्व नियमांना डावलून बेकायदेशीररित्या काम सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत भाकपा जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात PESA Act 1996, Forest Rights Act 2006, Environment Protection Act 1986, Indian Forest Act 1927 आणि MMDR Act 1957 या विविध कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कॉ. सचिन मोतकुरवार यांचे म्हणणे:
“हा संपूर्ण भाग आदिवासी हक्कांनी संरक्षित असून ग्रामसभेची परवानगी न घेता कोणतेही काम करणे हा कायद्याचा उघड भंग आहे. स्थानिकांच्या इच्छेविरुद्ध खदान लादण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.”

यासोबतच त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शासन व प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास भाकपा चा वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

निवेदन देताना कॉ. सुरज जककुलवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी एकमुखीपणे बेकायदेशीर खदान प्रकल्पाला विरोध दर्शवत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.

निवेदनात बेकायदेशीर कामांची चौकशी, सर्व कामे त्वरित बंद करणे, संबंधितांवर गुन्हा दाखल करणे व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ एकवटले आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.