ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शेतक-यांची ओळख पटवून रोज 30 लिटरपर्यंत डिझेल पुरवठा करा.. पंप चालकांसाठी जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश..

▪️साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 27 : चंद्रपूर जिल्ह्यात एचपीसीएल, आयओसीएल, बीपीसीएल, न्यायरा, जिओ या कंपन्यांचा पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तसेच त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा सुरू आहे. परंतु समाज माध्यमावरील अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी डिझेलची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटवून दररोज जास्तीत जास्त 30 लिटर डिझेलचा पुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी पेट्रोल पंपचालकांना दिले आहेत. याबाबत त्यांनी बुधवारी (दि.27) आदेश निर्गमित केले.

दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी पंत यांनी शहरातील पेट्रोल पंपावर अचानक धडक देऊन साठा रजिस्टरची तपासणी व ग्राहकांसोबत संवाद साधून अडचण जाणून घेतली होती. याबाबत जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून सर्व संबधित यंत्रणाना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलची साठेबाजी किंवा काळाबाजार होणार नाही. अतिरिक्त दराने पेट्रोल व डिझेलची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे ओळखपत्र, सातबारा, फार्मर आयडी, मोबाईल क्रमांक, गाडीचे आर.सी. बुक तपासून दर दिवशी जास्तीत जास्त 30 लिटर डिझेलचा पुरवठा करावा.

तसेच रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांनासुध्दा प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा. सर्व तहसीलदारांनी पथक स्थापन करून आपल्या तालुक्यातील पेट्रोलपंपांची तपासणी करावी व प्रत्येक आठवड्याला जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर करावा. प्रत्येक पेट्रोल पंपचालकाने आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त साठा व मागणी केलेला साठा, याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.

नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन भरून साठा करू नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असा फलकसुध्दा पंपाच्या दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. पेट्रोलपंप परीसरात सी.सी.टी.व्ही. यंत्रणा कार्यरत ठेवावी व तपासणी वेळी फुटेज उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. विक्री करण्यात येणाऱ्या डिझेलची नोंद ठेवण्यात यावी. तसेच तपासणी पथकास नोंद रजिस्टर उपलब्ध करून द्यावे. पेट्रोल पंपावर होणारी गर्दी आणि संभाव्य वाद टाळण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने पंपाच्या परिसरात नियमित गस्त ठेवावी. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप चालक/मालक/व्यवस्थापक यांची राहील, याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

शेतकऱ्यांनो येथे करा संपर्क : कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास 07172 – 252272 या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर आदेश तात्काळ प्रभावाने 30 जून 2026 पर्यंत लागू राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 व पेट्रोलियम नियम 2002 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.