आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांमुळे खळबळ; मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

गुंजेवाही घटनेनंतर जिल्ह्यात संताप..

काही दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात चार महिलांना आपला जीव गमवावा लागला. या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि महिला आता शेतात किंवा जंगलात जाण्यास घाबरत आहेत. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याकडे मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

निवेदनातील मुख्य मागण्या:

1) हल्ल्यांवर तातडीने नियंत्रण: सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांवर वन विभाग आणि प्रशासनाने तातडीने नियंत्रण मिळवावे.

2) धोकादायक वाघांचा बंदोबस्त: मानवासाठी धोकादायक ठरलेल्या वाघांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करावे.

3) मृतांच्या वारसांना सरकारी नोकरी: वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासनाने सरकारी नोकरी द्यावी.

4) सुरक्षा पथक आणि जनजागृती: जंगल परिसरातील गावांमध्ये विशेष सुरक्षा पथके तैनात करावीत आणि नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवावी.

5) तात्काळ आर्थिक मदत: मृतांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावे.

प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तात्काळ ठोस कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष महेश वासलवार, जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष रमेश काळबादे आणि सामाजिक कार्यकर्त्या मोनु दुर्गे प्रगती भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.