आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️युवा क्षमता विकास कार्यशाळा संपन्न..

▪️जागृत नागरिक हाच लोकशाहीचा खरा पाया! समाजसेवक गजानन हरणे यांचे प्रभावी मार्गदर्शन..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

अकोला – ( इंडिया 24 न्युज ) :
लोकशाही केवळ मतदानाच्या दिवशी जिवंत राहत नाही, तर ती प्रत्येक सजग नागरिकाच्या प्रश्नांमधून, जागरूकतेतून आणि उत्तरदायित्वाच्या मागणीतून अधिक सक्षम होत असते. “माहिती हा अधिकार आहे, उपकार नाही” हा ठाम संदेश देत ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रभावी मार्गदर्शन केले.पी.के.व्ही येथील कृषक भवनामध्ये युवा संस्था अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते, महिला भगिनी तसेच अकोला शहरातील विविध प्रभागातून आलेल्या जागरूक युवकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. लोकशाहीच्या पायाभूत मूल्यांना बळकटी देणाऱ्या माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचे महत्त्व उलगडून सांगताना सभागृहात जणू लोकजागृतीचा दीप प्रज्वलित झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते.आपल्या भाषणात समाजसेवक गजानन हरणे म्हणाले की, माहितीचा अधिकार हा केवळ कागदोपत्री कायदा नसून तो सामान्य नागरिकाच्या हातातील संविधानिक प्रकाश आहे. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता निर्माण करून भ्रष्टाचाराला आळा घालण्याची ताकद या कायद्यात आहे. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत जनतेच्या पैशाचा हिशोब विचारण्याचा अधिकार या कायद्यामुळे प्रत्येक नागरिकाला प्राप्त झाला आहे.कार्यशाळेदरम्यान माहितीचा अधिकार काय आहे, तो कोण वापरू शकतो, कोणत्या कार्यालयांकडून माहिती मागविता येते, अर्ज कसा करावा, अपील प्रक्रिया काय आहे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, शासकीय शाळा, महाविद्यालये, महावितरण, नगरपालिका तसेच शासकीय निधी घेणाऱ्या संस्थांकडून माहिती मिळविण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आली.प्रशिक्षण सत्रात अर्ज लेखन, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, प्रथम व द्वितीय अपील, माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची पद्धत, विकास कामांच्या निधी खर्चाची तपासणी, बांधकाम मोजमाप पुस्तिका, बिले, लाभार्थी यादी आणि विविध शासकीय योजनांची माहिती कशी मिळवावी याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले. “प्रश्न विचारू नका, माहिती मागा” हा प्रभावी मंत्र उपस्थितांना देताना माहिती नेमकी आणि कागदोपत्री मागविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.माहितीच्या अधिकारामुळे देशात अनेक गैरव्यवहार उघडकीस आले असून अपूर्ण विकासकामे, बनावट बिले आणि निधीतील भ्रष्टाचार समोर आल्याचे उदाहरणांसह सांगण्यात आले. ज्या समाजात नागरिक प्रश्न विचारतात, त्या समाजात प्रशासन अधिक जबाबदार बनते आणि विकास अधिक प्रामाणिक होतो, असे प्रतिपादनही गजानन हरणे यांनी केले.लोकशाहीच्या मंदिरात जागरूक नागरिक हेच खरे दीपस्तंभ असल्याचे सांगताना गजानन हरणे यांनी उपस्थित युवकांना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली. त्यांच्या ओजस्वी मार्गदर्शनामुळे कार्यशाळेला वैचारिक उंची लाभली.
बदलत्या सामाजिक आणि नागरी व्यवस्थेमध्ये युवकांनी केवळ प्रेक्षक न राहता स्थानिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेणे काळाची गरज असल्याचा जागरूकतेचा संदेश देणारी युवा क्षमता विकास कार्यशाळा कृषक भवन,अकोला येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
कार्यशाळेचा उद्देश युवकांमध्ये स्थानिक प्रश्नांविषयी समज निर्माण करणे, प्रशासनासोबत प्रभावी वकिली करण्यासाठी सक्षम करणे तसेच माहितीचा अधिकार अधिनियम २००५ विषयी सखोल माहिती उपलब्ध करून देणे हा होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहभागींची नोंदणी व ओळख सत्र घेण्यात आले. “माझ्या परिसरातील सर्वात मोठी नागरी समस्या” या विषयावर आयोजित कार्यशाळेत युवकांनी आपल्या परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि नागरी समस्यांबाबत मते मांडली. यामुळे कार्यशाळेच्या सुरुवातीलाच युवकांमध्ये संवादाचे वातावरण निर्माण झाले.यानंतर शहरातील स्थानिक प्रश्न म्हणजे काय, समस्या का निर्माण होतात, वैयक्तिक व सार्वजनिक समस्या यांतील फरक, तसेच महानगरपालिकेची रचना आणि विविध विभागांचे कार्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कोणती समस्या कोणत्या विभागाकडे मांडायची, निवेदन कसे द्यायचे आणि प्रशासनासोबत संवाद साधताना कोणती पद्धत अवलंबावी याबाबतही सविस्तर चर्चा झाली.
कार्यशाळेदरम्यान या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. प्रशासनासमोर प्रभावी मांडणी, निवेदन प्रक्रिया, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकसहभागातून प्रश्न सोडविण्याच्या विविध पद्धती युवकांना समजावून सांगण्यात आल्या. युवकांनी स्थानिक समस्यांचे विश्लेषण करून त्यावर कृती आराखडे तयार केले. युवकांच्या सहभागातून विविध नागरी प्रश्नांवर सामूहिक उपाययोजनांची दिशा निश्चित करण्यात आली.
यावेळी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर.सविस्तर मार्गदर्शन समाजसेवक गजानन हरणे यांनी केले. अधिकार तसेच स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी वापर कसा करावा याची माहिती सहभागी युवकांना देण्यात आली.कार्यशाळेच्या शेवटी युवकांनी स्थानिक प्रश्नांवर संघटित, सकारात्मक आणि लोकशाही मार्गाने काम करण्याची गरज व्यक्त केली. सहभागींच्या अभिप्रायानंतर कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन दत्ता पाटील यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.