▪️केळझर येथील बस स्थानक प्रवासी निवारा शेड मोडकळीस..
▪️बस स्थानक प्रवासी निवारा शेड चे बांधकाम त्वरित करावे - साईनाथ लोनबले, सामाजिक कार्यकर्ता

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुक्यातील केळझर येथील बस स्थानक प्रवासी निवारा शेड मागील अनेक वर्षापासून पडलेल्या अवस्थेत असून पूर्णतः मोडकळीस आलेला आहे.
केळझर हे अधिक लोकसंख्येचे गाव असून, इथून अनेक विद्यार्थी, प्रवासी व व्यवसायिक मूल तसेच इतर ठिकाणी एसटी बस ने जाणे – येणे करतात.पावसात,थंडीत आणि उन्हात उभे राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. मालधक्क्याच्या धुळीमुळे प्रवासी – विद्यार्थी कुठेही थांबू शकत नाही. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. साईनाथ लोनबले यांनी विभागीय नियंत्रक अधिकारी चंद्रपूर मान. होले साहेब यांची भेट घेऊन सदर प्रवासी निवारा शेड विषयी सविस्तर चर्चा केली असता, चर्चेत मान. होले साहेबांनी याविषयी माहिती सादर केली. एकूण तेरा गावातील बस स्थानक प्रवासी निवारा करिता यादी तयार केलेली आहे. त्या यादीत आपल्या केळझर गावाच्या बस स्थानक प्रवासी निवारा ची मागणी समाविष्ठ करून वरिष्ठ अधिकारी मुंबई, कडे पाठवू. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळताच प्राधान्याने केळझर येथील बस स्थानक प्रवासी निवारा शेड चे बांधकाम नक्कीच सुरु करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
त्याचप्रमाणे चंद्रपूर -केळझर -पोंभुर्णा मार्गे येणारी एस टी बस संध्याकाळी ७. ०० वाजता केळझर ला पाठवावे व सकाळी ७. ०० वाजता पोंभुर्णा – केळझर – चंद्रपूर मार्गे परत न्यावी. तसेच मूल – केळझर मार्गे एस टी बस शालेय विद्यार्थ्यासाठी संध्याकाळी ५. ०० वाजता सोडावी व येथून प्रवाश्यांना जाणे – येणे करण्याकरिता दुपारी ३. ०० वाजता केळझर – मूल मार्गे जाणारी एस टी बस सेवा सुरु करावी. अशी मागणी श्री. साईनाथ लोनबले सामाजिक कार्यकर्ते यांनी केली.
मागणी मंजूर न झाल्यास आम्ही केळझर येथील सर्व ग्रामस्थ चंद्रपूर येथील विभागीय नियंत्रक अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला. त्यावेळी मा. सचिन भंडारी, मा. सम्राट मानकर व ग्रामस्थ उपस्थित होते.



