▪️अतिवृष्टीमुळे पडोली गावातील आमटा वॉर्डात 250 घरांना फटका..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पडोली येथील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास 250 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. या घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मदतकार्य सुरू असून नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत हलविण्यात आले आहे. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी आज मंगळवारी अधिकाऱ्यांसह सदर परिसराची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी तहसीलदार विजय पवार, बीडीओ संगीता भांगडे, भाजप नेते नामदेव डाहुले, मंडळ अध्यक्ष विनोद खेवले, नकुल वासमवार, राकेश पिंपळकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कालपासून चंद्रपूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह ग्रामीण भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पडोली येथील आमटा वॉर्डातील स्थितीचीही त्यांनी पाहणी केली.
आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक सूचना केल्या. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकारी व प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
सध्या सर्व प्रभावित नागरिकांची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली असून त्यांना जेवण, पाणी व इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रभावित नागरिकांना शक्य तितकी मदत व दिलासा मिळावा, यासाठी मी सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधत आहे, असे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.



