▪️नगर परिषद राजुरा आणि गडचांदूरसाठी ५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी..!
▪️आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सकारात्मक प्रतिसाद...

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १५ मतदारसंघातील राजुरा आणि गडचांदूर नगर परिषदेच्या क्षेत्रातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. दोन्ही शहरांच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांच्या विकासकामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
या निधीसाठी आमदार देवराव भोंगळे यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश मिळाले आहे. या महत्त्वपूर्ण मंजुरीमुळे राजुरा आणि गडचांदूर शहराच्या विकासात मोठी भर पडणार असून अनेक लोकावश्यक कामे मार्गी लागणार आहेत.
🔸विकासाला चालना..
या ५ कोटींच्या निधीतून राजुरा नगरपरिषद अंतर्गत शहरातील इंदिरा शाळेच्या मागील परिसर येथे नगरपरिषदेचे योग भवनाचे बांधकाम करणे, सुतार समाज भवन येथे नगरपरिषदेचे सभामंडप बांधकाम करणे, क्रीडा संकुलन येथे मैदान व जॉगिंग ट्रकसह व्यायाम शाळा साहित्य उपलब्ध करणे, इंदिरानगर भागातील हनुमान मंदिर परिसर येथे नगरपरिषदेचे सभामंडप बांधकाम करणे, देशपांडेवाडी परिसरातील श्री गजाजन मंदिर येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे, कुंभार समाज वार्ड परीसरात सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे. जवाहरनगर परीसरातील उद्यानाअंतर्गत योगा शेड, विद्युत व्यवस्था करणे. (एलईडी बल्ब, हायमास्ट, सोलार हायमास्ट वगळून), धनोजे कुणबी समाज भवन परिसर येथे अत्याधुनिक वाचनालय बांधकाम करणे, मा. सा. कन्नमवार सभागृहाचे नुतनीकरण करणे, सरदार पटेल वाचनालयाचे नुतनीकरण करणे, खोजा समाज कब्रिस्तान अंतर्गत विकासकामे करणे, आंबेडकर वार्डातील नगरपरिषदेच्या वाचनालयाचे नुतनीकरण करणे, सोनियानगर परीसरात बौध्द धर्मीयांकरीता सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, भारत चौक परिसरात शिंपी समाजाकरीता सामाजिक सभागृह बांधकाम करणे, देशपांडे वाडी येथील खुल्या जागेत तेली समाजाकरीता सामाजिक सभागृह बांधकाम करणे, सोनियानगर येथील नगर परिषदेच्या हॉलचे नुतनीकरण करणे, सोमनाथपुर वार्ड येथील शाही कब्रस्थानात विकासकामे करणे, सोमनाथपुर वार्ड येथील रामानंद संप्रदाय सभागृह अंतर्गत विविध कामे व नुतनीकरण करणे, आणि शिवाजीनगर म्हाडा कॉलनी येथे आदिवासी भवन बांधकाम करणे तर गडचांदूर नगरपरिषद अंतर्गत गडचांदूर नगर परिषद अंतर्गत सर्वे क्र. ११८ व ११९ चे ओपन स्पेस मधील जागेत वातानुकुलीत वाचनालय बांधकाम करणे, गडचांदूर नगर परिषद सर्वे क्र. १२५ मधील आठवडी बाजारचे जागेत मटन मार्केट बांधकाम करणे आणि मुक्तीधाम येथे घाट पायरी, शेड इत्यादी बांधकाम करणे या विकासकामांचा समावेश आहे.
हा निधी दोन्ही शहरांतील मूलभूत समस्या सोडविण्यासाठी वापरला जाणार असल्याने यामुळे शहरांच्या नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. स्थानिक नागरिकांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास आहे.
🔸आमदार भोंगळे यांचे आभार..
या मंजुरीबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत. आमदार भोंगळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त करत, या विकासकामांना त्वरित सुरुवात करून राजुरा व गडचांदूर शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट केले. या निर्णयामुळे दोन्ही शहरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



