आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जीवनाच्या शाळेत आम्हीच उच्चशिक्षित नवभारत साक्षरता कार्यक्रमात आजी आजोबांचा सूर..

▪️विश्र्वशांती विद्यालयात प्रेरणादायी उपक्रम..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जे कोणी प्राशन करतील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत.आजच्या घडीचा विचार केला असता सर्वत्र शिक्षणाचे जाळे पसरले आहेत. कोणताही मूल शिक्षणापासून वंचित राहिलेला दिसत नाही. विज्ञानाचे युग असल्यामुळे त्रांत्रिक शिक्षणात झपाट्याने वाढ होत चालली आहे. या युगात ज्ञानाचे शिक्षण जरी मिळत असले तरी जीवनातील खरे शिक्षण मिळणे तेवढेच कठीण झाले आहे. आमच्या काळात ज्ञान कमी असले तरी जीवन जगण्याचे सामर्थ्य तेवढेच प्रबळ आहेत त्यामुळे जीवनाच्या शाळेत आम्हीच उच्चशिक्षित आहोत असा सूर नवसाक्षर आजी आजोबांनी काढला आहे. विश्र्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कुनघाडा रै येथे आयोजित केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नवसाक्षरांची परीक्षा घेण्यात आली त्यावेळी ते मुख्याध्यापक व शिक्षकांशी हितगुज करताना बोलत होते. खरंतर शिकण्याला वय नसतो असाच त्यांचा अनुभव होता.
शिकता शिकता मध्येच शाळा सोडलेले कधीही शाळेत न गेलेले व्यक्ती यांची अक्षर ओळख राहूनच गेली. त्यांना आधी निरक्षर आणि आता असाक्षर म्हणून ओळखले जात आहे. आज ते अक्षराचे जरी असाक्षर असतील परंतु आयुष्याच्या शाळेत मात्र हे सर्वजण उच्चशिक्षितच आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या समोर बसलेले बहुतांश पन्नाशी- साठी नंतरचे जवळपास ७०- ७५ वर्षापर्यंत वय असलेले वृद्ध होते. काहींच्या हाताला सुरकुत्या पडलेल्या, केस पिकलेले, काहींच्या डोळ्यावर भिंगाचे चष्मे, काहीजण काठी घेऊन चालत होते तर काहीजण विचारमग्न होते. स्त्रिया छान नऊवारी लुगडं किंवा नऊवारी साडी घालून अंगभर पदर घेऊन आल्या होत्या. आणि आजोबा डोक्यावर पांढरी टोपी, धोतर, सदरा घालून मनात हित घेऊन आले होते. शाळेचे मुख्याध्यापक तथा परीक्षा केंद्र संचालक एस आर मेश्राम आणि परीक्षा नियंत्रक गजानन गोरे यांना एक आजी म्हणाली गुरजी जरा लवकर आटपा बरं आम्हांल जायाचं. गुरुजी म्हणाले आजी आता कुठं जाता?
आजी म्हणाल्या, “गुरजी आम्हालं निंदायला जायचं हाये. बाया पुढ गेल्या आमच्या.”
त्यावर गुरुजी म्हणाले “बाप्पा एवढं हित! म्हातारपणी एवढं हित कशाला करता?”
यानंतरच्या वाक्याने गुरुजींनी करीत असलेल्या कामाला सुद्धा बळ मिळाले. आजी म्हणाली,” बापा गुरुजी काम केल्याने माणूस मरते का? होते तव्हरक कराव.” आजींचे वाक्य प्रचंड प्रेरणादायी होते. हातपायात पाहिजे तसा जोर नाही, डोळ्याने नीट दिसत नाही परंतु मनात प्रचंड ऊर्जा घेऊन ही पिढी जगत आहे. या पिढीला ना कधी सध्याच्या लोकांसारखं फ्रस्ट्रेशन आलं ना कधी स्ट्रेस आला! कारण यांची स्वतःच्या मनगटावर, कर्मावर आणि ईश्वरावर सुद्धा प्रचंड श्रद्धा आहे. सोबतच आयुष्याकडून मोजक्या अपेक्षा, कुणाचाही द्वेष मत्सर न करणे, कुणावर न जळने आणि आपलेपण जपणे असे अनेक गोष्टी असल्याने कधी ताण आला नाही. हीच लोकं पिढी, संस्कृती आणि गावपण जपणारी आहेत.
या पिढीने असंख्य आव्हाने पेलून जीवन जगले. संसारातील प्रचंड अडचणीला तोंड देऊन लेकरांचे लाड, शिक्षण, आजारपण असे कर्तव्य केले. यांचे केस पिकले ते त्यांच्या केलेल्या संघर्षाने, अनुभवाने आणि त्यागाने! या पिढीने अनेक सुख आणि मौजेचा त्याग करून आपल्या लेकराबाळाला सांभाळून त्यांना घडवलं आणि मढवलं! कधी एक वेळ न जेवता तर कधी उपाशी राहून, लाल ज्वारी, लाल गहू खाऊन पोट भरली पण आपली संस्कृती आणि संसार टिकवून ठेवले. आजही या स्त्रिया म्हातारपण आलेलं असूनही त्यांच्या नजरेत एक प्रकारचे उच्च दर्जाचे लाजणे आहे. गुरजी म्हटला की त्यांच्या नजरा आपोआप लाजतात किंवा आदरराने झुकतात. आजही या पिढीने अक्षराचे शिक्षण घेतले नसले तरी गुरुजी बद्दलचा आदर आणि आस्था कमालीची आहे.
गुरुजींना असं वाटत होतं की परीक्षा लवकर संपू नये. कारण काही आज्या आणि काकू छान त्यांच्या वेळेच्या छान छान गोष्टी सांगत होत्या. एक आजी म्हणाली गुरुजी माझी नात तुमच्या शाळेत शिकत आहे ती माझ्यावर लई जीव लावते बरं.” गुरुजी म्हणाले “आजी, आम्ही मुलांना नेहमी सांगतो की, आपल्या आजी आजोबासोबत दहा मिनिट गप्पा मारत जा.” आजी म्हणाली, “माझी नात खूप गप्पा मारते मह्यासंग.” आजीचं हे वाक्य ऐकून खूप बरं वाटलं. एक आजी तर चक्क व्हरांड्याच्या खाली चप्पल काढून वर निघाल्या. तेवढ्यात त्यांना शिक्षिका कु. निकिता कारडे म्हणाल्या, “आजी अहो वर घेऊन जा चप्पल. आजी म्हणाली,”नाही बापा वर नेली तर तुम्ही बोलसाल.” एवढा आदर म्हणा किंवा त्यांच्या बालवयातील शाळेचा धाक आजही त्यांच्या मनात जाणवला. म्हणून असं वाटते की आनंददायी शिक्षण किती आवश्यक होतं. या पिढीतील अक्षराने असाक्षर परंतु जीवनाच्या शाळेत प्रचंड हुशार आणि अनुभवी व्यक्तींना भेटून खरंच एक प्रकारचे बळ मिळाले. परिस्थिती कशीही असो जगणं आणि लढणं सोडायचं नाही ही शिकवण आज या निमित्ताने मिळाली.पुन्हा यातून एकच सांगावेसे वाटते की शिक्षण नवे संस्कार जुनेच बरे असे उद्गार शिक्षक गजानन गोरे यांनी काढले. शाळेच्या वतीने सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.