▪️मेरा युवा भारत गडचिरोली तर्फे केवळरामजी हरडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : मेरा युवा भारत गडचिरोली तर्फे केवळरामजी हरडे महाविद्यालय, चामोर्शी येथे २९ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात, दणक्यात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. हा दिवस महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम वाढवणे, शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि संघभावना जोपासणे हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक आदरणीय डॉ. महेश जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण देत क्रीडा म्हणजे केवळ खेळ नसून जीवनातील शिस्त, परिश्रम व प्रामाणिकपणा शिकवणारे साधन असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम, खेळ आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयाच्या क्रीडा समितीतर्फे व मेरा युवा भारत गडचिरोली तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कबड्डी, रस्साखेच (Tug of War) आणि व्हॉलीबॉल यांसारख्या रोमांचक खेळांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला. मैदानावर उत्साहवर्धक जयघोष, शिस्तबद्ध व्यवस्थापन व खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ पाहून वातावरण भारावून गेले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विजयी संघांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. पराभूत संघांचेही उत्तम खेळाबद्दल कौतुक करण्यात आले. डॉ. जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की विजय-पराजय यापेक्षा सहभाग व प्रामाणिक प्रयत्न अधिक महत्त्वाचे असतात.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, क्रीडा विभाग, तसेच स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्साह, क्रीडाप्रेम, शिस्त व संघभावना विशेष उल्लेखनीय होती. राष्ट्रीय क्रीडा दिनाचा हा सोहळा सर्वांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवून गेला.



