▪️परतीच्या पावसाने हिरावले शेतकऱ्यांच्या तोंडचे घास..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : फार मोठी मेहनत करून शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामाची सुरुवात केली. मात्र ऐन पिक गर्भाशयात असतानाच परतीच्या पावसाने घात करून शेतकऱ्यांच्या तोंडचे घास हिरावल्यामुळे शेतकरी चांगलाच दुःखाच्या खाईत सापडला आहे.
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे देशातील सर्वांचे जीवनमान शेतीवरच अवलंबून आहे. शेतकऱ्यांजवळ दुसरा कुठलाही पर्यायी व्यवसाय नसल्यामुळे त्याला शेतीशिवाय तरणोपाय नाही. हवामान खात्यानुसार यावर्षी शेतकऱ्यांनी लवकरच खरीप हंगामाचे नियोजन आखून शेतीची सुरुवात केली. उशिरा पाऊस पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून रोवणी पेक्षा आवत्याला पसंती दिली. सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी असतानाही हात पाण्यावर पऱ्हे जगवून जुलै अखेरीस पाऊस पडल्याने रोवणीला सुरुवात केली. यावर्षी अनेक प्रकाराच्या प्रजातीच्या बियाणांची पेरणी करण्यात आली आहे. किड, मावा, कडा करपा यासारख्या अनेक रोगांपासून बचाव करून पिकांची जोपासना केली असता. ऐन पिक गर्भाशयात असताना व काही प्रमाणात कापणी व बांधणी सुरू असतानाच परतीच्या पावसाने घात केल्यामुळे शेतातील पीक जमिनीवरच झोपून गेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे लोंब्या पाण्यात कुजून गेले आहेत. आधीच शेतकरी अनेक संकटाशी सामना करून थकून गेला आहे. त्यातच परतीच्या पावसाने भर घालून शेतकऱ्यांच्या तोंडचे घास हिरावल्यामुळे शेतकरी चांगलाच मेटाकुटिस आला आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.



