▪️निवडणूक आली की चेहरे बदलतात, समस्या मात्र नाही..!
▪️राजकारणाच्या गर्दीत मूल शहर कुठे हरवलं?; लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, तर जबाबदारी..!

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : निवडणुकीचा हंगाम आला की मूल शहर रंगीबेरंगी होर्डिंग्ज, घोषणावाक्ये आणि “विकास”च्या वचनांनी सजते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना नव्या चेहऱ्यांची हसरी पोस्टर्स, “जनतेचा आशीर्वाद” मागणारे बॅनर, पक्षांचे ध्वज आणि ढोलताशांच्या गजरात राजकारणाचा रंग चढतो. पण या चमकदार गर्दीत मूल शहराच्या खऱ्या समस्या मात्र तशाच जागी उभ्या आहेत.
गेल्या कित्येक वर्षांत विकासाची भाषणे झाली, योजनांचे आश्वासन दिले गेले, पण आजही शहराचे रस्ते खड्ड्यांनी भरलेले, नाल्यांची सफाई अपुरी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अनियमित आणि आरोग्यसेवा अपुऱ्या आहेत. पावसाळा संपला तरी रस्त्यांची डागडुजी पूर्ण झालेली नाही. हॉस्पिटलच्या नावाला मोठे बोर्ड आहेत, पण नागरिकांना उपचारासाठी अजूनही शहराबाहेर धाव घ्यावी लागते.
शहरातील नागरिक प्रश्न विचारतात —
“किती निवडणुका आल्या, किती नगरसेवक बदलले, किती पक्ष बदलले — पण आमच्या जीवनातील अडचणी तशाच का राहिल्या?”
प्रत्येक निवडणुकीत वचनं नवी, चेहरे नवे, पण स्थिती तीच. दहशतमुक्त आणि सुरक्षित शहराचे आश्वासन दिले जाते, पण गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या मनात प्रश्न आहे —
“विकास फक्त फोटोशूटपुरता मर्यादित का राहतो?”
नवीन नेतृत्व दिसतं, जुनं मागे हटतं, काही जण अचानक पुढे येतात — आणि निवडणूक संपताच हेच चेहरे पुन्हा गायब होतात. संपर्क तुटतो, नागरिकांचा आवाज पुन्हा कोपऱ्यात बसतो.
लोकशाही ही फक्त मतदानाची प्रक्रिया नाही, तर जबाबदारीची व्यवस्था आहे. मत मागणे हा उद्देश नसून समस्या सोडवणे हे नेतृत्त्वाचे खरे कर्तव्य आहे. पण दुर्दैवाने, समस्यांवर उपाय शोधायला कुणालाही फुरसत नाही.
मूल च्या लोकांचा प्रश्न आजही तोच आहे —शहर हरवलंय का?फाटक्या रस्त्यांत? खड्ड्यांत?रिकाम्या नळांत आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात?की प्रशासनाच्या उदासीन फाईलांमध्येआणि आरोग्याच्या समस्यामध्ये?मूल शहर अतिक्रमनाच्या विळख्याने ग्रासलेले आहे.
आज शहराला नेते नव्हे, व्यवस्था हवी आहे.वचने नव्हे, अंमलबजावणी हवी आहे.बॅनर नव्हे, योजना हव्या आहेत.आवाज नव्हे, उत्तरं हवी आहेत.
निवडणूक संपेल, भाषणं थांबतील, होर्डिंग्ज उतरतील — पण नागरिकांच्या मनातला एकच प्रश्न कायम राहील…“राजकारणाच्या गर्दीत मूल शहर कुठे हरवलं?”

