▪️महावितरणचे “स्मार्ट टीओडी मीटर”: सवलतीचा नवा प्रकाश..
▪️ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 13 फेब्रुवारी 2026: तंत्रज्ञानाच्या युगात घड्याळे, मोबाईल आणि टीव्ही ज्याप्रमाणे ‘स्मार्ट’ झाले, त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील वीज व्यवस्थाही कात टाकत आहे. महावितरणने राज्यातील 3 कोटी 16 लाख ग्राहकांसाठी ‘स्मार्ट टीओडी (Time of Day)’ वीज मीटर आणले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिलच मिळणार नाही, तर चक्क वीज दरात सवलत मिळवण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध झाली आहे.
या नवीन उपक्रमाबाबत काहीविघ्नसंतोषींकडून गैरसमज पसरवले जात असले, तरी वस्तुस्थिती मात्र अत्यंत फायदेशीर आणि ग्राहकभिमुख आहे.
स्मार्ट टीओडी मीटर हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार वीज वापर मोजण्याची सुविधा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपया पर्यंत सवलत मिळणार आहे. 1 जुलै 2025 पासून ही सवलत लागू झाली असून, घरगुती ग्राहकांसाठी अशा प्रकारची ही पहिलीच ऐतिहासिक सवलत आहे.
जर तुम्ही दरमहा 100 युनिट वीज वापरत असाल, तर जुन्या दरानुसार तुमचे बिल साधारण 875 रुपये येत होते. नवीन दरकपात आणि स्मार्ट मीटरच्या टीओडी सवलतीमुळे हेच बिल आता फक्त 784 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही थेट तुमचे पैसे वाचवू शकता.
नवीन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांना एकही पैसा द्यावा लागणार नाही. हे मीटर 100 टक्के मोफत लावले जात आहेत. अचूक रीडिंगमुळे ‘सरासरी’ किंवा ‘अंदाजे’ बिलांचा त्रास संपणार आहे. जेवढी वीज वापरली, तेवढेच बिल येणार. हे मीटर पूर्णपणे पोस्टपेड आहेत. सध्याच्या मासिक पद्धतीप्रमाणेच ग्राहकांना बिल भरायचे आहे. महावितरणच्या खास ‘अॅटप’वर तुम्हाला तासागणिक किती वीज वापरली जात आहे, याची माहिती मिळेल. घर बंद असले तरी मीटर रीडिंग आपोआप मुख्यालयात नोंदवले जाईल.
सौर ऊर्जा ग्राहकांसाठी ‘वरदान’
‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प लावणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर अत्यंत उपयुक्त आहे. हे मीटर नेट-मीटरिंगचे कामही करते, ज्यामुळे तुम्ही ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज आणि स्वतः वापरलेली वीज याचा अचूक हिशेब ठेवणे सोपे होईल.
मीटर बदलणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यापूर्वी मॅकॅनिकल मीटर जाऊन डिजिटल आले आणि आता अधिक प्रगत ‘स्मार्ट’ मीटर येत आहेत. यासाठी कोणतेही कर्ज काढलेले नसून केंद्र सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबवला जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
“ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. स्मार्ट मीटर हे पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि वीज बिलात सवलत देण्यासाठीच आणले आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करा आणि घरचे वीजबिल कमी करा,” असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.



