आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मोरवा येथे आधुनिक विमानतळ उभारणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ठोस पाठपुरावा..

विमानतळ उभारणीसाठी आवश्यक जमीन अधिग्रहण व १८०० मीटर धावपट्टीची जोरदार मागणी..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

मुंबई – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेत मोरवा येथे आधुनिक व्यावसायिक विमानतळ उभारण्याचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडत राज्य सरकारचे लक्ष वेधले. विद्यमान धावपट्टीचा विस्तार करून ती १८०० मीटरपर्यंत वाढविणे, आवश्यक जमीन अधिग्रहित करून सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन विमानतळ उभारणे आणि चंद्रपूरला व्यावसायिक विमानसेवेच्या नकाशावर आणणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आ. मुनगंटीवार यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीनंतर मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेत, मोरवा विमानतळाच्या उभारणीसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याची ग्वाही सभागृहात दिली.

चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीचा केंद्रबिंदू, देशातील महत्त्वाचे वीजनिर्मिती केंद्र, सिमेंट उद्योगांचा प्रमुख जिल्हा आणि जागतिक कीर्तीच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र एवढी क्षमता असूनही जिल्हा आजही विमानसेवेपासून वंचित असल्याची खंत व्यक्त करत आ. मुनगंटीवार यांनी मोरवा विमानतळ हा चंद्रपूरच्या विकासाचा निर्णायक टप्पा ठरेल, असे आ. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (BRTC), सैनिक स्कूल, ऊर्जा प्रकल्प तसेच भविष्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने मोरवा विमानतळ हा चंद्रपूरच्या विकासाचा कणा ठरेल, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. विमानतळामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच उद्योग, व्यापार आणि रोजगारनिर्मितीलाही मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोरवा येथे सध्या फ्लाईंग क्लब कार्यरत असला तरी केवळ ९५० मीटर धावपट्टी असल्यामुळे व्यावसायिक विमानसेवा सुरू होणे शक्य नाही. त्यामुळे आवश्यक जमीन अधिग्रहित करून धावपट्टी १८०० मीटरपर्यंत विस्तारित करणे, आधुनिक टर्मिनल इमारत, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, नाईट लँडिंग सुविधा आणि सर्व आवश्यक पायाभूत सुविधांसह नवीन विमानतळ उभारण्यात यावा, अशी ठोस मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.

या संदर्भात तयार करण्यात आलेल्या सादरीकरणावर मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, चंद्रपूरच्या विकासासाठी हा प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याची भूमिका शासनाची असल्याची माहितीही आ. मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली.

यावर उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि विकासाभिमुख पाठपुराव्याचे विशेष कौतुक केले. मोरवा विमानतळ हा केवळ चंद्रपूरपुरता मर्यादित विषय नसून महाराष्ट्राच्या औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाशी संबंधित महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूरच्या विकासासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेले प्रयत्न अभ्यासाचा विषय ठरू शकतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

ना. शेलार यांनी पुढे सांगितले की, मोरवा विमानतळासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, धावपट्टीचे १८०० मीटरपर्यंत विस्तारीकरण, आधुनिक आराखडा तयार करणे आणि व्यावसायिक विमानसेवेसाठी आवश्यक सर्व सुविधा उभारण्याबाबत शासन सकारात्मक असून, संबंधित सर्व विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प गतीने मार्गी लावण्यात येईल.

ताडोबा पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक चालना देणे, औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करणे, व्यापाराला वेग देणे आणि चंद्रपूरच्या विकासाला नवे पंख देणे या दृष्टीने मोरवा येथील आधुनिक विमानतळ महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असून, हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी आ.मुनगंटीवार यांना दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.