▪️मूल तहसील च्या वतीने राजगड येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन..
▪️ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी प्रवृत्त करणारे : दीपक देशपांडे

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढा देण्यासाठी प्रवृत्त करणारे असल्याने ग्राहक म्हणून सगळ्या जनतेनी ही संधी कधीच चुकवू नये ,असे प्रतिपादन या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित दीपक देशपांडे यांनी २४डिसेंबर रोजी उपस्थितांना संबोधित करताना केले.
तहसील कार्यालय मूल व जागृत ग्राहक राजा ग्राहक संघटना, तालुका शाखा मूल यांचे संयुक्त विद्यमाने राजगड ग्रामपंचायत राजगड येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात राजेश शिरभाते निरिक्षण अधिकारी तहसील कार्यालय मूल यांचे अध्यक्षतेखाली दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत,आणि नायब तहसीलदार पंदिले यांचे सोबत रविंद्र चौधरी सरपंच राजगड,ग्रामपंचायत अधिकारी कुंडामवार, अशोक मैदमवार,रमेश डांगरे, डॉ. आनंदराव कुळे कार्यकारिणी सदस्य जागृत ग्राहक राजा,के.पी.उइके,मंडळ अधिकारी राजगड आदी मान्यवर उपस्थित होते , याप्रसंगी शासनाच्या वतीने कृषी सहायक,समुह सहायक, पोस्ट ऑफिसचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना रमेश डांगरे यांनी ग्राहक चळवळीचा इतिहास,ग्राहक शब्दाची व्याप्ती,ग्राहकांचे अधिकार, फसवणूक प्रकार याबाबत सविस्तर माहिती दिली, आणि जागृत राहून व्यवहार करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
अशोक मैदमवार यांनी ग्राहकांचे कर्तव्य व अधिकार पटवून देताना एका सुंदर कवितेतून शब्दांची गुंफन केली.
डॉ आनंदराव कुळे यांनी वजनमापांतील तफावत, फसवणूक टाळण्यासाठी सजगतेची आवश्यकता, शेतकऱ्यांची बाजारपेठेत फसवणूक, मागील कित्येक महिन्यांपासून प्रमाणित न केलेले चुकीचे वजनमाप काटे,इलेक्ट्रॉनिक काट्यांमध्ये अप्रमाणित वजनमापे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
दीपक देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यातून ग्राहक कुणाला म्हणायचे,तो राजा कसा आहे , यासोबतच सध्या प्रचलित तीनही राजांची फसवणूक कशी होते आहे , प्रत्येक जण कसा त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करुन घेताहेत , ही फसवणूक टाळण्यासाठी आपले अधिकार व हक्क समजून घेण्याची आवश्यकता असल्याने अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे , स्वातंत्र्योत्तर काळात आणि ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ च्या कायद्याला ३९वर्षे पूर्ण झाली असली तरी आजही या कायद्याविषयी मोठ्या प्रमाणात ग्राहक अज्ञानी असल्यामुळे अशा कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे आहे आणि यानिमित्ताने शासन आपल्या दारी येऊन वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जनपयोगी योजना सर्वसामान्यांना कळतील अशाप्रकारे समजावून सांगणे व ग्राहकांची फसवणूक होणार नाही असा प्रयत्न करणं अपेक्षित असताना विविध विभागांचे अधिकारी या कार्यक्रमात अनुपस्थित असतात. हा चिंतनाचा विषय आहे , याविषयी ग्राहकांनी जागरुकतेने विचारणा करण्याची आवश्यकता, खरेदी करताना पावतीची मागणी आणि शेतकऱ्यांनी बी बियाणे, खते खरेदी करताना पावती , पिशवी, टॅग आणि मुठभर धान्य शेवटपर्यंत जपून ठेवण्याची आवश्यकता स्पष्ट केली व ग्राहक तक्रार निवारण आयोगात जर तक्रार दाखल करायची झाल्यास महत्वाचे पुरावे म्हणून उपयोगी पडतात ,या पुराव्याशिवाय आपण आपली फसवणूक झाल्याचे सिद्ध करु शकत नाही हे अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले. आणि आपण मोबदला आणि नुकसानभरपाई सुद्धा मिळवू शकतो हे स्पष्ट केले. आणि म्हणूनच आपले हक्क व आपले अधिकार मिळविण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन आणि आपण याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
नायब तहसीलदार विजय पंदिले यांनी ग्राहकांनी आपल्या अधिकारांवर ती जागरुक राहून व्यवहार करण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले.
राजेश शिरभाते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहकांचे अधिकार व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ह्या कार्यक्रमाचे आयोजन आणि जागृत ग्राहक राजा च्या मागणीनुसार हा कार्यक्रम आम्ही ग्रामीण भागात घेत असल्याचे व ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती मान्यवरांनी आपल्याला दिली असल्याचे स्पष्ट करीत जनतेच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला .
तलाठी राजगड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,तर कृषी सहायक राजगड यांनी कृषी विभागाच्या विविध योजना,समुह सहायक मधुलिका लिडवे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी व अन्य योजना व पोस्ट ऑफिसच्या बचत खाते ते विमा योजना अशा अनेकानेक ग्राहकोपयोगी योजनांची माहिती यावेळी दिली, पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व नंतर कार्यक्रम अतिशय थाटात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला गावातील विद्यार्थी, नागरिक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप मंडळ अधिकारी उईके यांच्या आभारप्रदर्शनाने करण्यात आला.

