▪️मूल शहरातील थकित घरपट्टीवरील व्याज माफ करण्याची मागणी..
▪️नगरसेवक ऋतिक गोयल यांनी घेतला थकबाकीदारांचा कैवार..

डॉ.आनंदराव कुळे
मुल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : नगर परिषद मूल हद्दीतील नागरिकांच्या थकीत घरपट्टीवरील व्याज आकारणी माफ करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक ऋतिक दिनेश गोयल यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे.
याबाबत मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गोयल यांनी म्हटले आहे की, नगर परिषदेकडून थकीत घरपट्टीवर दरमहा २ टक्के प्रमाणे व्याज आकारणी करण्यात येत आहे. मात्र सध्याची आर्थिक परिस्थिती, महागाई आणि सर्वसामान्य नागरिकांची अडचण लक्षात घेता ही व्याज आकारणी नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार ठरत आहे.
मूल शहरातील अनेक नागरिक मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असून रोजगाराच्या मर्यादित संधी, वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे अनेकांना घरपट्टी भरणे कठीण जात आहे. त्यामुळे थकबाकीवरील व्याज माफ केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
नगर परिषद ही नागरिकांना मूलभूत सुविधा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था असून कर वसुली करताना नागरिकांवर अनावश्यक आर्थिक ताण पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. इतर अनेक नगर परिषदांमध्ये अशा प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
थकीत घरपट्टीवरील व्याज पूर्णपणे माफ करण्याचा प्रस्ताव नगर परिषद सभेत ठेवून सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक ऋतिक गोयल यांनी केली आहे.
नागरिकांच्या हिताचा विचार करून प्रशासनाने या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेवक गोयल यांनी व्यक्त केली आहे.



