◼️कांग्रेसला मोठा धक्का; चिमूरचा लढवय्या नेता भाजपच्या गोटात

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही ( इंडिया २४ न्यूज) दि.२६/०२/२०२६
चिमूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात सतीश वारजुरकर यांच्या पक्षांतराने खळबळ उडाली आहे. कांग्रेसचे निष्ठावंत व खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या वारजुरकर यांनी अचानक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने गावागावात व राजकीय पातळीवर चर्चाना उधाण आले आहे.
निवासस्थानी झाली महत्वाची भेट
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वारजुरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत विविध राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
विशेष म्हणजे या बैठकीत आमदार बंटी भांगडिया हे देखील उपस्थित होते. त्यामुळे या पक्षांतरामागे मोठे राजकीय समीकरण असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
काँग्रेसला बसला धक्का
वारजुरकर यांच्या जाण्यामुळे इंडियन नॅशनल काँग्रेसला चिमूर क्षेत्रात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
स्थानिक पातळीवर लढवय्या नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीने, भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही कार्यकर्त्यांच्या मते, यामुळे पक्षाची ताकद कमी होऊन संघटनात्मक खिंडार पडण्याची शक्यता आहे.
विजय वडेट्टीवार यांच्यावर परिणाम
राजकीय जाणकारांचे मते, नागभिड लगतच्या ब्रम्हपुरी परिसरातील अनेक गावे वारजुरकर यांच्या प्रभावाखाली असल्याचे मानले जाते. त्यामुळे समीकरणे बदलतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यात आपली मजबूत पकड निर्माण केली असल्याने, त्यांच्या राजकीय बळावर तातडीने परिणाम होणार नाही असेही काहीचे मत आहे.
यश की अपयश
वारजुरकर यांचे भाजपमध्ये जाणे हा मास्टरस्ट्रोक ठरेल की राजकीय जोखीम – याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू झाल्या आहेत. चिमूर तालुक्यातील पुढील राजकीय घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही घडामोड स्थानिक राजकारणात मोठे वळण ठरते की तात्पुरती खळबळ, हे येणारा काळच ठरवणार आहे.



