▪️गरीबांच्या झोपडीत प्रकाश पेरणारा चंद्रपूरचा प्रकाशमय हिरा- लोकसेवक सुधीरभाऊ मुनगंटीवार

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
मुंबई – ( इंडिया 24 न्युज ) : राज्याच्या राजकारणात ज्यांचे नाव लोकाभिमुख नेतृत्व म्हणून अग्रक्रमाने घेतले जाते, असे चंद्रपूरकरांचे स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार. त्यांच्या कार्याबद्दल जितके लिहावे तितके कमीच आहे. ‘सुधीरभाऊ’ हे नावच जणू एक वेगळे रसायन आहे. त्यांच्या काम करण्याची शैली अनेकांना प्रेरणा देणारी आहे, तर त्यांच्या प्रत्येक उपक्रमामागे असलेली नियोजनबद्ध आखणी खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे.
पक्षातील असो अथवा पक्षाबाहेरील कार्यकर्ता, प्रत्येकांसाठी सहज उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून राज्यात सुधीरभाऊंची वेगळी ओळख आहे. एखादा विषय हाती घेतला की तो कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेण्याची त्यांची जिद्द आणि कार्यपद्धती सर्वश्रुत आहे.तरुण आमदार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे भाजप प्रदेशाध्यक्ष, अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच चंद्रपूर, वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यांचे पालकमंत्री अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. या प्रत्येक भूमिकेत त्यांनी राबविलेल्या अनेक विकासात्मक उपक्रमांची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे.
आमदार म्हणून सभागृहात विविध संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून प्रश्न मार्गी लावणे, तर मंत्रीपदाचा योग्य उपयोग करत राज्याच्या हितासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेऊन ते प्रत्यक्षात उतरवणे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे ही त्यांची कार्यशैली सर्वपरिचित आहे. तसेच पालकमंत्री म्हणून केवळ पदाची जबाबदारी न निभावता, जिल्ह्याचे खरे पालकत्व स्वीकारत विकासाला योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. याच कार्यतत्परतेमुळे भाऊ सर्वांसाठी “सुपरस्टार” ठरले आहेत.
सत्ता असो अथवा नसो, याचा विचार न करता केवळ सामान्य जनता, शेतकरी-शेतमजूर, अंध-अपंग, निराधार माता, विधवा व घटस्फोटित भगिनी यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठीच आपण लोकप्रतिनिधी झालो आहोत, हा एकमेव संकल्प मनाशी बाळगून त्यासाठी सातत्याने संघर्ष करणारा योद्धा म्हणजे भाऊ. त्यामुळेच ते आज सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरत आहेत आणि पुढेही ठरत राहतील.
भाऊंच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आहे की, त्याबद्दल कितीही लिहिण्याचा प्रयत्न केला तरी तो अपूर्णच राहील. गरीबांसाठी घरकुल योजनेचा विषय प्रलंबित असताना भाऊंनी या अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांचे वारंवार लक्ष वेधत हा प्रश्न मार्गी लावला. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून चंद्रपूर जिल्ह्यातील गरीबांच्या झोपडीत प्रकाश आणत त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यातही ते यशस्वी ठरले.हीच भाऊंच्या कामाची खरी खासियत आहे. म्हणूनच चंद्रपूरसह संपूर्ण परिसरात गोरगरीब जनतेसाठी भाऊ केवळ आमदार नसून एक “देवमाणूस” असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात व्यक्त होताना ऐकायला मिळते.
चंद्रपूर जिल्ह्याच्या भूमीत लोकनायक सुधीरभाऊ मुनगंटीवार यांसारख्या देवरूपी व्यक्तिमत्त्वाचा जन्म होणे, ही आमच्या चंद्रपूरकरांसाठी खरोखरच मोठी भाग्याची गोष्ट आहे. येणाऱ्या काळात भाऊ मंत्रीपदाची शपथ घेऊन राज्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्याचा अधिक वेगाने विकास करतील, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.भाऊंना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य लाभो आणि ते कायम जनतेच्या सेवेत कार्यरत राहोत, अशीच मनोमन प्रार्थना गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत करतो.
गरीबांच्या झोपडीत प्रकाश देणारा चंद्रपूरचा प्रकाशमय हिरा लोकसेवक सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आवाज राज्याच्या कानाकोपऱ्यात आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून कायम घुमत राहो, हीच दैवततुल्य पूज्यनीय सुधीरभाऊंना मनःपूर्वक सदिच्छा.



